मुंबईकरांना खाद्यपदार्थ २४ तास ऑनलाईन मागवता येणार; झोमॅटो, स्विगी आदींकडून खाद्यपदार्थचे पार्सल मिळणार घरपोच

मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू व विकेंड शनिवारी - रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू केले आहे. तर इतरवेळी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. मात्र, फळे विक्रेते, मेडिकल, किराणा विक्रेते यांना निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.

    मुंबई : कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. तर विकेंडला कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र असे असले तरी मुंबईकरांना झोमॅटो, स्विगी आदींकडून ऑनलाईनने खाद्यपदार्थ आणि ई-कॉमर्सच्या वस्तू २४ तास मागवता येणार आहेत. शुक्रवार ते सोमवारपर्यंतच्या विकेंड लॉकडाऊनच्या कालावधीतही त्यावर कोणतेही बंधन असणार नाही. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी बुधवारी याबाबतचे सुधारित परिपत्रक जारी केले.

    मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू व विकेंड शनिवारी – रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू केले आहे. तर इतरवेळी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. मात्र, फळे विक्रेते, मेडिकल, किराणा विक्रेते यांना निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. तर उपहारगृहे बंद ठेवण्यात आली असून त्यांची पार्सल सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, विकेंड लॉकडाऊन असल्याने शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवार सकाळ ७ वाजेपर्यंतच्या निर्बंधादरम्यान, उपहारगृहातील पार्सल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या कालावधीत घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शुक्रवार ते सोमवारच्या निर्बंधांच्या काळात रस्त्यावरील खाद्यपदार्थ तसेच फळांच्या स्टॉल्सना पार्सल किंवा सुरक्षित अंतर ठेवून विक्री करता येणार असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.

    • निर्बंधांच्या काळात विद्यार्थी, स्पर्धा परिक्षार्थींना त्यांच्या परीक्षा देता येतील. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना त्यांचे हॉल तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक असणे बंधनकारक आहे.
    • घरकामगार, चालक, स्वयंपाकी, परिचारिकांना नाईट कर्फ्यूतून सूट
    • हातावर पोट असलेले घरकामगार तसेच स्वयंपाकी, चालक, परिचारिका, ज्येष्ठ आणि आजारी व्यक्तींची सेवा करणाऱ्या व्यक्तींना नाईट कर्फ्यूमधून वगळण्यात आले आहे. त्यांना आठवडाभर सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत काम करायला सूट देण्यात आली आहे. मात्र डोळ्यांचे क्लिनिक आणि चष्मांच्या दुकानांना राज्य सरकारने नेमून दिलेल्या वेळेतच काम करता येणार आहे.