कानाकोपऱ्यातील मुंबईकरांना कोरोनाची लस मिळणार; BMC बनवणार स्वतंत्र ॲप

मुंबई : कोरोनाची लस कधी येणार? कशाप्रकारे असणार? उपलब्ध कधी होणार? असे अनेक प्रश्न सध्या मुंबईकरांच्या मनात घोळत आहेत. पण, याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाकडेही नाही. मात्र, कोरोना लसीकरणासाठी पालिका आरोग्य विभाग सध्या युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे.

प्रत्येक मुंबईकराला कोरोना लस मिळावी यासाठी आरोग्य विभाग सध्या विविध योजना आखत आहे.  यासाठी  पालिका आरोग्य विभाग एक स्वतंत्र ‘ॲप’ देखील बनविण्याच्या तयारीला लागला आहे.

हा ॲप केंद्र सरकारच्या ‘को-विन’ या ॲपच्या धर्तीवर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मागील दहा महिन्यांपासून आर्थिक राजधानी मुंबई करोनाबरोबर लढा देत आहे. कोरोनाचे संकट कधी टळणार? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. यात कोरोना लशीची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत.

शुक्रवारी झालेल्या आरोग्य विभागाच्या टास्क फोर्सच्या बैठकीत लस आल्यास कुठे साठवणूक करुन ठेवायची? कशाप्रकारे नागरिकांना द्यायची? कोणाची निवड करायची? अशा अनेक प्रश्नांवर मार्ग काढण्यात आला. याचबरोबर या बैठकीत केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘‘को-विन’’ॲपबाबतही सादरीकरण करण्यात आले.

या ॲपच्या धर्तीवर पालिका प्रशासन स्वतंत्र ॲप तयार करणार असल्याचे ठरविण्यात आले व यावर  सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगीतले की, पालिका लसीकरण करीता स्वतंत्र ॲप बनविण्याच्या तयारीत आहे. सध्या या ॲपवर आमचा अभ्यास सुरु असून केंद्र सरकारच्या को-विनच्या आधारे हा ॲप असणार आहे. यात प्रत्येक मुंबईकरांची इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे.

ॲप कसे असणार?

या स्वतंत्र ॲपमध्ये प्रत्येक मुंबईकराची माहिती असणार आहे. याशिवाय या अॅपमध्ये कोव्हीड झालेल्या नागरिकांची स्वतंत्र माहिती, कोव्हीड न झालेल्यांची माहिती,  इतर प्रत्येकाला असलेल्या आजारांबाबतची माहिती असणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीचा आधारकार्ड व पॅनकार्ड नंबर लिंक असणार आहे. याद्वारे संबंधित व्यक्तीने लस घेतली की नाही? याबाबतची माहिती मिळणार.  तसेच लसीकरणाची पुढील तारीख देखील या ॲपद्वारे आपल्याला मिळणार आहे. तसेच आपले वास्तव्य असलेल्या पिन कोडच्या आधारावर केंद्र सरकारकडूनही वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे.  हा ॲप सतत अपडेट केला जाणार ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीबाबतची लसीकरणा संदर्भातील माहिती मिळणे सहज शक्य होणार आहे. तसेच या ॲपवर लसीकरणासाठी देखील नोंदणीकरण करण्याची सुविधा दिली जाणार आहे.