‘ब्रिमस्टोवॅड’ प्रकल्पाच्या नियोजनाचा बोजवारा, कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईची तुंबई

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाला १९९३ पासून सुरुवात झाली असली, तरी त्याला २००५ मधील महापुरानंतरच खऱ्या अर्थाने वेग आला. महापालिकेने या प्रकल्पावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला आहे. मुंबईतील ताशी ५० मिलिमीटर प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचे नियोजन केले. मात्र दरवर्षीच्या मुसळधार पावसांत तुंबणा-या पावसामुळे ब्रिमस्टोवॅडचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट होते.

  मुंबई – मुंबईतील पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आणि पुरावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने गेल्या १५ वर्षापासून राबवलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेने या प्रकल्पावर आतापर्यंत तब्बल २,२३८.०४ कोटी रुपये खर्च केले. मात्र अजूनही मुंबईतील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवता आलेले नाही. यापूर्वी आणि गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसात मुंबईची उडालेली दाणादाण यावरून प्रकल्पाचे नियोजन कोलमडल्याचेच समोर आले आहे.

  गेल्या २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या जलप्रलयानंतर भविष्यातील पुरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. २००७ मध्ये हा प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारमार्फत पालिकेने केंद्राला विस्तृत प्रकल्प अहवाल सादर केला. या प्रकल्पाला तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने १२०० कोटींचा निधी विशेष आर्थिक सहाय्य मंजूर केला होता. त्यापैकी आतापर्यंत एक हजार कोटी रुपये पालिकेला मिळाले आहेत.

  मागील १५ वर्षात ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात दोन टप्प्यांमध्ये कामे करण्याचे प्रस्तावित होते. पहिल्या टप्प्यातील २० मोठ्या नाल्यांच्या रूंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंतींच्या बांधकामांपैकी १८ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये ३७.२४ किमी लांबीपैकी ३६.२४ किमी लांबीची (९७ टक्के) कामांचा समावेश असून दुस-या टप्प्यातील ३८ कामांपैकी २४ कामे पूर्ण झाली आहेत.

  ७४.८९ किमी लांबीपैकी ६०.१७ किमी लांबीची म्हणजे ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजे प्रकल्पातील एकूण ५८ मोठ्या नाल्यांच्या कामांपैकी ४२ कामे पूर्ण झाली आहे. तर तीन कामांची निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर उर्वरित १३ कामे हाती घेण्यात आली आहेत. सरासरी ८९ टक्के लांबीची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागाकडून देण्यात आली.

  दरम्यान, नाल्यांच्या बहुतांश भागांवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. नाला रुंदीकरणादरम्यान झोपड्यांचे सर्वेक्षण पात्रता निश्चितीचे काम केले जाते आहे. मात्र झोपडीधारकांना स्थलातंर नको आहे. त्यांचा स्थलांतराला विरोध असल्याने ही कामे रखडली असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

  ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाला १९९३ पासून सुरुवात झाली असली, तरी त्याला २००५ मधील महापुरानंतरच खऱ्या अर्थाने वेग आला. महापालिकेने या प्रकल्पावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला आहे. मुंबईतील ताशी ५० मिलिमीटर प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचे नियोजन केले. मात्र दरवर्षीच्या मुसळधार पावसांत तुंबणा-या पावसामुळे ब्रिमस्टोवॅडचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट होते.

  अतिवृष्टीच्या काळात समुद्राला येणा-या मोठ्या भरतीच्या वेळेत पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्याासाठी नाल्यांच्या आऊटलेटजवळ ईर्ला, वरळी, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया, क्लिव्हलँड, गझदरबंध, मोगरा व माहूल या आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन प्रस्ताावित करण्यात आली होती. त्यापैकी सहा पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण होऊन सुरू झाली आहेत. उर्वरीत माहूल व मोगरा पंपिंग स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया तसेच पंपिंग उभारणीसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  या कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र पहिल्या पावसात पाणी साचण्याच्या समस्य़ेला मुंबईकरांना तोंड द्यावे लागत असल्याने या प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसांत मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

  नदीला पूर येऊन बाजूच्या वसाहतीत पाणी शिरले. दरडी कोसळून ३० जणांचा बळी गेला. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्वात मोठा ‘ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी कोट्य़वधी रुपये खर्च होऊनही पाणी मुंबई तुंबत असल्य़ाने अशा प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.

  ब्रिमस्टोवॅड प्रकल्प सुरू – १९९३
  क्षमता – ताशी ५० मिलिमीटर पावसाचे पाणी वाहून नेण्याची
  प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च – १२०० कोटी रुपये
  आतापर्यंत झालेला खर्च – २,२३८.०४ कोटी रुपये