मुंडे, खडसे, बावनकुळे आणि… भाजपाने ओबीसी नेत्यांवर राज्यात अन्याय केला?

एकनाथ खडसेंची नाराजी भाजप नेतृत्वाला दुर करता आली असती पण ते त्यांनी केलं नाही. पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव होण, बावनकुळे आणि तावडेंना तिकीटच न मिळणं अशा घटनांमुळे भाजपमध्ये OBC नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्रीमंडळ विस्तारात जेव्हा प्रितम मुंडे, पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्ष करुन पुढे आलेल्या नेत्यांना जेव्हा डावललं जातं तेव्हा निश्चितच OBC समाजाची हानी होते.

  मुंबई : सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. यात “ओबीसी समाजाला आरक्षण आम्हीच देणार” अशी भूमिका सर्वच राजकीय पक्ष घेत असले तरी या प्रश्नाबाबत भाजपा मात्र काहीसा गोंधळलेला दिसतो.

  ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपने राज्यभर केलेल्या आंदोलनावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल.” या वक्तव्याने फडणवीस चांगलेच ट्रोल झाले आणि चर्चा सुरू झाली भाजपमधील ओबीसी नेत्यांची आणि त्यांना डावललं जाण्‍याची.

  पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या आधी भाजप ची सूत्र ओबीसी नेत्यांच्याच हातात होती असं म्हणावं लागेल. मुंडे, खडसे, बावनकुळे असे मातब्बर नेते भाजप सोबत होते आणि आहेतही. पण या ओबीसी नेत्यांची सध्याची अवस्था काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्याच्या घडीला भाजपचे हे सर्वच ओबीसी नेते नाराज आहेत.

  भाजपचं राज्यातील सक्षमीकरण

  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1989 मध्ये भाजप सोबत युती केली. या युक्ती साठी भाजप कडून प्रमोद महाजन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत 1989 ची लोकसभा आणि 1990 चे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकींचा सकारात्मक निकाल लागला आणि राज्यात भाजपच्या जागा वाढायला सुरुवात झाली.

  एकेकाळी अत्यंत क्षीण प्रभाव असलेला भारतीय जनता पक्ष आज देशातला सर्वात मोठा आणि प्रभावशाली पक्ष बनला आहे. ‘शेटजी-भटजींचा पक्ष’ अशी ओळख असलेल्या या पक्षाला आता मध्यम जाती, अन्य मागास वर्ग, दलित, आदिवासी अशा सर्व घटकांची मजबूत मतं मिळत आहेत. आणि याचं श्रेय जातं एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना कारण त्यांनी राज्यात भाजप तळागाळात पोहोचवली.

  माधव समीकरण

  भाजपने माळी, धनगर, वंजारी समाजात आपलं नेतृत्व तयार करून सदस्य संख्या वाढवली. या समाजात भाजपचे नेतृत्व करणारी नेते मंडळी म्हणजे माळी समाजाचे नेते ना. सा. फरांदे, धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे, वंजारी समाजाचे नेतृत्व करणारे नेते गोपीनाथ मुंडे. या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 1995 मध्ये शिवसेनेसोबत युती करून सत्ता मिळवली.

  खरच भाजपमध्ये OBC नेत्यांवर अन्याय केला जातोय का?

  एकनाथ खडसेंची नाराजी भाजप नेतृत्वाला दुर करता आली असती पण ते त्यांनी केलं नाही. पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव होण, बावनकुळे आणि तावडेंना तिकीटच न मिळणं अशा घटनांमुळे भाजपमध्ये OBC नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्रीमंडळ विस्तारात जेव्हा प्रितम मुंडे, पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्ष करुन पुढे आलेल्या नेत्यांना जेव्हा डावललं जातं तेव्हा निश्चितच OBC समाजाची हानी होते.

  ‘दिर्घकालीन परिणाम दिसतील’

  यासंदर्भात नवराष्ट्रला प्रतिक्रीया देताना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, “आज तुम्ही गोपीचंद पडळकरांना आणाल उद्या आणखी कुणाला आणाल पण जे नेतृत्व प्रस्थापितांना शह देत सिध्द झालं होतं अशा नेतृत्वाला दुर ठेवणं त्यांना डावलणं हे मात्र फार दिर्घकालीन परिणाम करणारं आहे. त्यामुळे भाजपवर जे OBC नेतृत्वाला डावलल्याचे आरोप होतात याकडे गांभीर्याने पाहायला हवं.”

  निष्ठावंतांच्या पदरी निराशा

  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला जी चार पदं देण्यात आली त्यातील तीन पदं ही भाजप नेतृत्वाने आयारामांना दिली आहेत. यातून भाजपला फार स्पष्ट संदेश द्यायचा आहे तो म्हणजे, ‘ भाजपात जे पूर्वाश्रमीचे आमदार-खासदार आणि मंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी मधून आले आहेत त्यांची अस्वस्थता कमी करणे. आणि केंद्राप्रमाणे जर महाराष्ट्रात सत्ता आली तर भाजप व निष्ठावंतांपेक्षा या आयारामांना सत्तेमध्ये योग्य ते मानाचे स्थान दिले जाईल.’ त्यामुळे आता पंकजा, प्रीतम मुंडे बंड करतात का, त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र काय सांगते? मोदी किंवा नड्डा यांच्या भेटीने हे सगळं शांत होणार का? हे येत्या काही काळात कळेल.