नऊ टँकर चालकांविरूद्ध पालिकेने केले गुन्हे दाखल; सिमेंट मिक्सरमधून रस्त्यावर काँक्रीट सांडल्याने कारवाई

माटुंगा मार्गाने खासगी रेडीमिक्स सिमेंट टँकरची वर्दळ सुरु असते. या टँकरमधून रस्त्यावर काँक्रीट पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. काही अपघातदेखील झाले आहेत. याबाबत टँकर चालकांवर अनेकदा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही काँक्रीट पडण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.

    मुंबई (Mumbai): माटुंगा (Matunga) येथे सार्वजनिक रस्त्यावर सिमेंट मिक्सर टँकरमधून (cement mixer tanker) सिमेंट काँक्रीट सांडल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने (The Mumbai Municipal Corporation) नऊ टँकर चालकांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिकांना काँक्रीटचा त्रास होत असल्याचे नागरिक व नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. याची दखल घेऊन पालिकेने कारवाई केली आहे.

    माटुंगा येथील टी. एच. कटारिया मार्गावरून वर्षभरापासून जड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. माटुंगा मार्गाने खासगी रेडीमिक्स सिमेंट टँकरची वर्दळ सुरु असते. या टँकरमधून रस्त्यावर काँक्रीट पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. काही अपघातदेखील झाले आहेत. याबाबत टँकर चालकांवर अनेकदा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही काँक्रीट पडण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.

    सिमेंट काँक्रीटमुळे पादचारी आणि मोटर सायकलस्वार घसरून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच स्थानिकांना काँक्रीटचा त्रास होत असल्याचे नागरिक व नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. पालिकेने याची दखल घेऊन पोलिसांच्या मदतीने नऊ टँकर चालकांविरूद्ध धारावीतील शाहूनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.