पालिकेने ३१ हजार खड्डे बुझवले, रस्ते विभाग, वॉर्डकडून काम सुरू

मुंबईतील रस्त्यांवरील नेहमीच मोठी वर्दळ असल्याने छोट्या प्रमाणात खड्डा पडल्यानंतर काही वेळातच त्याचा मोठा खड्डा होण्याचे प्रकार वाढतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढत असल्याने पालिका एप्रिलपासूनच खड्डे बुजवण्याचे काम सुरू करते. मात्र म्हाडा, एमएमआरडीए, पश्चिम द्रुतगती मार्ग लिंक रोड आदी इतर प्राधिकरणांच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या खड्ड्यांसाठीही पालिकेलाच जबाबदार धरले जाते

    मुंबई – मुंबईकरांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी पालिकेचा रस्ते विभाग आणि विभाग कार्यालये, कंत्राटदारांच्या माध्यमातून अहोरात्र खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये गेल्या एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल ३० हजार ७८० खड्डे बुजवण्यात आले आहेत. शिवाय सद्यस्थितीतही सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. रस्ते, पूल, वाहतूक प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर यांनी ही माहिती दिली.

    मुंबईतील रस्त्यांवरील नेहमीच मोठी वर्दळ असल्याने छोट्या प्रमाणात खड्डा पडल्यानंतर काही वेळातच त्याचा मोठा खड्डा होण्याचे प्रकार वाढतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढत असल्याने पालिका एप्रिलपासूनच खड्डे बुजवण्याचे काम सुरू करते. मात्र म्हाडा, एमएमआरडीए, पश्चिम द्रुतगती मार्ग लिंक रोड आदी इतर प्राधिकरणांच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या खड्ड्यांसाठीही पालिकेलाच जबाबदार धरले जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेने एप्रिलपासूनच आपल्या अखत्यारीतील खड्ड्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट केले.

    दरम्यान, पालिकेच्या माध्यमातून मजबूत रस्ते बनवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच रस्त्याच्या मटेरियलमध्ये प्लॅस्टिकचा वापर करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामही सुरू झाले आहे. सर्व २४ वॉर्डमध्ये कंत्राटदारांच्या माध्यमातून अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे.