कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता? गणेशोत्सवातील खबरदारीचा पालिका आराखडा तयार करणार

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वांना तयारीचे वेध लागले आहेत. मात्र कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा होणार, कोणती नियमावली असणार असे प्रश्न भाविकांना पडत आहेत. राज्य सरकारने याआधीची सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूट तर घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत ठेवून कोरोना काळात खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार अनेक मंडळांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करण्याचे जाहीर केले आहे.

    मुंबई – कोरोनाची दुसरी लाट जवळ जवळ संपुष्टात आली आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती अजून असल्याने पालिकेने दक्षता घेतली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सवही खबरदारी घेऊनच यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. उत्सवातील खबरदारीचा उपाय म्हणूननच पालिका आराखडा तयार करणार असून त्या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास कोरोनाला आपण प्रतिबंध करू शकतो असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला.

    यंदाच्या गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी राहणार आहे. तर घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन पालिकाच करणार आहे.यामध्ये सोसायटयांच्या गेटवर वाहन नेऊन मूर्ती स्वीकारण्यात येणार आहे. विसजर्नासाठी सुमारे १७० कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.

    गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वांना तयारीचे वेध लागले आहेत. मात्र कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा होणार, कोणती नियमावली असणार असे प्रश्न भाविकांना पडत आहेत. राज्य सरकारने याआधीची सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूट तर घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत ठेवून कोरोना काळात खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार अनेक मंडळांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करण्याचे जाहीर केले आहे.

    अनेक ठिकाणी विसर्जनसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता विसजर्नासाठी कृत्रिम तलाव बनवून पालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छोटया मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अन्यथा पालिकेच्या कृत्रिम तलावांत विसर्जन करावे, विसर्जन स्थळांवर गर्दी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

    गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वीच्या काळात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा दर ०.६ टक्क्यांवर आला होता. गणपतीनंतर काही दिवसांनी रुग्णवाढीचा दर १.३० टक्क्यांपर्यंत वाढला होता. यामध्ये कोरोना वाढीचे निश्चित कारण समोर आले नसले तरी गणेशोत्सवात वाढलेल्या भेटीगाठीमुळे रुग्णसंख्या वाढल्याचा अंदाज आरोग्य तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता.

    गणेशोत्सवाचे वेध लागल्यानंतर महिनाभर आधीच सार्वजनिक मंडळांसह अनेक घरगुती गणेशोत्सवासाठी नियोजन सुरू होते. यामध्ये अचानक कठोर नियम जाहीर केल्यास नागरिकांच्या रोषाचा सामना प्रशासनाला करावा लागू शकतो. त्यामुळे पालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबईसाठी आवश्यक नियमावली करण्यास सुरुवात केली आहे.

    गणेशोत्सवाबाबत येत्या १० आॅगस्ट रोजी पालिका आणि सार्वजनिक गणेशोत्सव समिती प्रतिनिधींसोबत बैठकही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली. दरम्यान, मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यामुळे निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दी वाढून कोरोनाचा धोका वाढू शकतो. याच पाश्वर्भूमीवर गणेशोत्सवातही कोरोना खबरदारीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.त्यासाठी पालिका आराखडा तयार करत असल्याचे सांगण्यात आले.