कोरोना रोखण्यासाठी पालिका प्रयत्नशील, प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर; बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनची आकडेवारी सादर

मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांनी ॲड. अर्शिल शहा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांच्यावतीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.

    मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. तरीही पालिका प्रशासन त्याला आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्यासाठी पालिकेने बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि तपासणी मोहीम मोठ्या संख्येने राबवली असून वर्षभरापासून आतापर्यंत पालिकेने ५५ लाख ४३ हजार ५०२ जणांच्या चाचण्या केल्या आहेत. अशी माहिती प्रतिज्ञापत्रमार्फत पालिका प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली.

    मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांनी ॲड. अर्शिल शहा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांच्यावतीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक ११ लाख ७२ हजार ५५९ जणांच्या कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात ३८ लाख १६ हजार ३८६ आरटीपीसीआर, आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार १७ लाख २७ हजार ११६ लोकांच्या अँटीजेन तपासण्या केल्या. सद्य परिस्थितीत पालिकेकडे पुरेसे बेड उपलब्ध असून ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुद्धा आवश्यक साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात प्रतिज्ञा पत्रातून देण्यात आली आहे.

    तसेच दिवसाला सरासरी १७१९ रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत असून आठवड्याला १२ हजार ३३ रेमडेसिवीर इंजेक्शन रूग्णांसाठी वापरले जात आहेत. २७ एप्रिल रोजी पालिकेकडे १३ हजार ११० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा होता अतिरिक्त इंजेक्शन पैकी ११०० डोस ठाणे महापालिका तर ५०० डोस पुणे महापालिकेला पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे, पालिकेच्या सहा मोठ्या रुग्णालयाजवळ १६ मोठे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले असून ३० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर, ५१३ जम्बो सिलेंडर, ११८५ लहान सिलेंडर बॅकअप म्हणून या रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे.