महापालिकेचा भोंगळ कारभार; लाखो रुपयांच्या मालमत्ता कराच्या नोटिसांनी गोरेगावकर हैराण

मोतीलालनगरमधील रहिवासी म्हाडाकडे प्रत्येक महिन्यास भाडे देत आहेत. त्या रक्कमेत पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, मालमत्ता कर, देखभाल खर्च आदींचा समावेश असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, पालिकेकडून मालमत्ता कर आकरण्यामागील कारणे उलगडू शकलेली नाहीत. त्यावर, बैठकीत तोडगा निघेल अशी रहिवाशांची अपेक्षा आहे.

    मुंबई: पश्चिम उपनगरातील गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगर १,२,३ मधील रहिवाशांना पालिकेने १९६१ पासूनचे मालमत्ता कर भरण्याच्या नोटीस पाठविल्या आहेत. मालमत्ता कराची रक्कम लाखो रुपयात असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्याची दखल घेत म्हाडा, पालिका अधिकारी आणि स्थानिकांमध्ये उध्या गुरुवारी बैठक होणार आहे. पालिकेने म्हाडाच्या भूखंडावर १९६१ पासून वसलेल्या मोतीलालनगरमधील रहिवाशांना १९६१ पासून मालमत्ता कराच्या नोटीसा पाठवल्या आहेत. म्हाडाचे भाडेकरू असलेल्या रहिवाशाना आठ खोल्यांसाठी मिळून ३९ लाख ते थेट ९० लाखापर्यंत मालमत्ता कर भरण्याच्या नोटीस देण्यात आल्याने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.

    त्यातून मार्ग काढण्यासाठी रहिवाशांच्या जनकल्याण समितीने राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. त्यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी म्हाडा, पालिका आणि स्थानिक रहिवाशांमध्ये गुरुवारी बैठक ठरविण्यात आले. गोरेगाव पश्चिमेतील जवाहरनगरमधील सभागृहात बैठक घेतली जाणार आहे. त्यात म्हाडा, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रहिवासी संघटनांचे पदाधिकारी, गृहनिर्माण संस्थेचे प्रत्येकी एका पदाधिकाऱ्यास बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.