प्रेयसीच्या हौसेपोटी वृद्धेचा खून करून चोरी ; यूपीत प्रियकराला तर मुंबईत प्रेयसीला अटक

इमरान हा मूळचा यूपीचा रहिवासी असून त्याच परिसरात भाड्याने राहत होता. सध्या तो सलूनमध्ये नोकरी करत होता. रतनलाल जैन या व्याजाने पैसे देतात, हे त्याला माहीत होते. इमरानच्या घरमालकिणीने त्यांच्याकडून पैसे घेतल्याने त्या इमरानला भाड्याचे पैसे जैन यांना थेट देण्यास सांगत होत्या. त्यामुळे इमरान याची जैन यांच्यासोबत ओळख झाली.

  मुंबई – प्रेयसीच्या हौसपोटी भांडुपमधील ७० वर्षीय वृद्धेचा खून करून लाखो रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या प्रियकराला भांडुप पोलिसांनी यूपीत बेड्या ठोकल्या तर प्रेयसीला मुंबईत अटक करण्यात आली. इमरान मुंने मलिक (२६) यासह त्याची प्रेयसी दीपाली राऊत (३६) अशी आरोपींची नावे आहेत. तब्बल ४० दिवस विशेष पोलीस पथकाने उत्तमरीत्या तपास करून अखेर या गुन्ह्याची उकल केली, अशी माहिती पत्रकार परिषदेत परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

  भांडुप पश्चिमेकडील क्वारी रोड येथील फुगावाला कम्पाऊंड परिसरात रतनलाल मोहनलाल जैन (७०) या एकट्याच राहत होत्या. १५ एप्रिल २०२१ रोजी राहत्या घरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. सदर माहिती प्राप्त होताच भांडुप पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी परिमंडळ ७ च्या हद्दीतील पोलिसांचे विपथके नेमण्यात आले.

  भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी २५० कुटुंबियांची व ५०० हून अधिक नागरिक तसेच जैन यांच्याकडून पैसे घेणारे वाहनधारक, त्यांचे नातेवाईक, ९८ ज्वेलर्स दुकानदार, आंबे विक्रेत्यांकडेही चौकशी केली. ३०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसानी तपासले.

  तपासादरम्यान, त्याच परिसरात राहणारा इमरान नावाचा इसम बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी इमरानचा शोध सुरू केला असता तो उत्तर प्रदेश (यूपी) येथील मूळगावी असल्याचे समजले. त्यानुसार तपासी पथक तात्काळ यूपीला रवाना झाले. सापळा लावून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

  इमरान हा मूळचा यूपीचा रहिवासी असून त्याच परिसरात भाड्याने राहत होता. सध्या तो सलूनमध्ये नोकरी करत होता. रतनलाल जैन या व्याजाने पैसे देतात, हे त्याला माहीत होते. इमरानच्या घरमालकिणीने त्यांच्याकडून पैसे घेतल्याने त्या इमरानला भाड्याचे पैसे जैन यांना थेट देण्यास सांगत होत्या. त्यामुळे इमरान याची जैन यांच्यासोबत ओळख झाली.

  दरम्यान, प्रेयसी आणि इमरान यांच्यात पैशांवरून वाद होऊ लागला. नेहमी प्रमाणे १५ एप्रिल रोजीही दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. प्रेयसीला पैसे देण्यासाठी इमारान याने जैन यांच्या घरात डल्ला मारण्याचे ठरवले. त्यानुसार तो जैन यांच्या घरी आला. त्याने बहाणा करून जैन यांना स्वयंपाकघरात जाण्यास भाग पाडले आणि पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र जैन या स्वयंपाकघरातून आल्याची चाहूल लागताच इमरान याने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्या जमिनीवर कोसळताच त्याने घरातील साडेतीन लाखांचे दागिने घेऊन पळ काढला.

  घडलेला प्रसंग प्रेयसी दीपाली हिला सांगितला. पोलीस जर माझ्यापर्यंत आले तर सर्व हकीगत सांगेल, असे तिने सांगताच अटकेच्या भीतीने इमरान याने गाव गाठले. दोन वर्षांपूर्वी याच प्रेयसी दीपाली हिने इमरानच्या विरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली होती, अशी माहिती तपासात उघडकीस आल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.

  तपासी पोलीस पथक

  सदर गुन्ह्याचा तपास पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दराडे, परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, भांडुप विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ढाकणे, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे, पोलीस निरीक्षक उन्हवणे, पोलीस निरीक्षक गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे (मुलुंड पोलीस ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर (भांडूप पोलीस ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले (पार्कसाईट), सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जातक, कांजूरमार्ग पोलीस उपनिरीक्षक दिनेश बागुल, उमेश शिंदे, शरद बागल, रविकांत नंदनवर (भांडुप), पोलीस उप निरीक्षक अमित यादव (पंतनगर) तसेच अरक मालवणकर, अरक मढव, पोलीस अंमलदार सुनील पवार, नागेश दरेकर, धनराज आव्हाड, दिनेश पाटील, संदीप लुबाल, अनिल वाघ, मिनानाथ कासार, नितीन पाटील, सचिन गांजाळे, आनंद मानकर, सूयर्कांत शेट्टी, धीरज गरुड, रोहिदास पवार, प्रकाश गोंधळी, बाळू कोळी, नथु कचरे, उमाकांत पाटील, लालसिंग राठोड, किरण निकम, रणजित ठाकूर, संतोष राठोड, प्रवीण खरे, निनाद जाधव या विशेष पथकाने केली.