उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत असल्याने मुंबई महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर भाजपचे मूक आंदोलन

मुंबई: मागील दीड महिन्यापासून मुंबईतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या,वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचे हाल, मॄत्यू, कोलमडलेली आरोग्य सेवा यामुळे मुंबई महापालिकेतील भाजप

 मुंबई:   मागील दीड महिन्यापासून मुंबईतील  वाढती कोरोनाबाधितांची संख्या,वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचे हाल, मॄत्यू, कोलमडलेली आरोग्य सेवा यामुळे मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मूक निदर्शने करत रुग्ण वाचवा, मुंबईकर वाचवा यासाठी मूक आंदोलन केले. आयुक्तांना खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याचे आणि याला बिलंब लावणाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. पक्षनेता विनोद मिश्रा,  प्रवक्ता भालचंद्र शिरसाट तसेच अन्य वरिष्ठ नगरसेवक यांनी मुंबईच्या महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी, मास्क बांधून एक तास मूक धरणे आंदोलन केले. 

कोरोनामुळे त्रस्त मुंबईकर रुग्ण बेडसाठी वणवण भटकत आहेत. बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर मिळाला नाही म्हणून आजपर्यंत शेकडो रुग्ण दगावले आहेत.
राज्य शासनाकडून आदेश येऊन १४ दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्यात आले नाहीत. परिणामी साध्या बेड्स,  अतिदक्षता-व्हेंटिलेटर बेड्स मुंबईकरांना उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेकांना उपचार मिळत नाही. उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासठी मूक धरणे आंदोलन केल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाजपने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यानंतरही  मुंबई महापालिकेतील सत्ताधारी, शासन, प्रशासनाने अद्याप खासगी रुग्णालयातील वैद्यकीय बेडस ताब्यात घेतलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के म्हणजेच १६,००० बेड्सबाबत महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी. हे बेड्स २४ तासांत ताब्यात घ्यावेत आणि महापालिका व खासगी रुग्णालयातील सर्व उपलब्ध बेड्सची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॅशबोर्डवर आणावी तसेच  हा डॅशबोर्ड मोबाइल अॅपवर सामान्य मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा. खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचाराचे दरपत्रक प्रसिद्ध करावे, आदी मागण्या भाजपने आज झालेल्या आंदोलनात केल्या.