मराठा समाजाची नाराजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भोवण्याची शक्यता;  गुप्तचर अहवालाने महाविकास आघाडीच्या तंबूत घबराट!

हिंदुत्वापासून फारकत घेत असलेल्या शिवसेनेला मुस्लिम बहुल मतदारांसमोर कल्याण डोंबिवली, औरंगाबादमध्ये तसेच काही प्रमाणात वसई विरार आणि नवी मुंबईत देखील मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ऍन्टीइन्कंबन्सीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, असे गुप्तचर अहवालात सांगण्यात आल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

किशोऱ आपटे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात कोंडी झाली आहे, त्यातच मराठा समाजाची नाराजी सरकारला येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात भोवण्याची शक्यता आहे, असा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे. हिंदुत्वापासून फारकत घेत असलेल्या शिवसेनेला मुस्लिम बहुल मतदारांसमोर कल्याण डोंबिवली, औरंगाबादमध्ये तसेच काही प्रमाणात वसई विरार आणि नवी मुंबईत देखील मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ऍन्टीइन्कंबन्सीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, असे या अहवालात सांगण्यात आल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

या नाराजीचा मोठा फटका राष्ट्रवादीलाही बसणार आहे. मात्र हा अहवाल कॉंग्रेसची जास्त चिंता वाढविणारा आहे. मराठा आरक्षण समितीवर प्रमुख असलेल्या अशोक चव्हाण यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करत विनायक मेटे यांनी मराठा मतदारांमध्ये महाविकास आघाडी बाबत संभ्रम वाढविण्याचे काम वखुबी सुरू ठेवले आहे असे या सूत्रांनी सांगितले. एमआयएमचा हुकूमी हैद्राबाद पँटर्न तर दुसरीकडे मनसेचा नव हिंदुत्वांचा प्रयोग आणि प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या दलित, बहुजन वंचित आघाडी मार्फत महाविकास आघाडीला नामोहरम करण्याची रणनीती वापरली जाणार आहे.

स्थानिक पातळीवर वादाची शक्यता

याशिवाय महाविकास आघाडीत जागा वाटपावरून स्थानिक पातळीवर वाद होण्याची शक्यता असल्याने स्वबळाची चाचपणी करण्यासाठी गुप्तचर अहवालाचा हवाला घेण्यात आला असता मराठवाड्यात शिवसेना आणि दोन्ही कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची चिन्हं असल्याचे तथ्य समोर आले आहे. त्यातच मग नामांतराचा मुद्दा घेत मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यात मनसे सारख्या नव हिंदुत्वाच्या पक्षानेही उडी घेतल्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाची ‘स्पेस’ घेण्याचा प्रयोग केला जाणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.

भेदनितीला सुरुवात

राज्यातील शिक्षक- पदवीधर मतदारसंघातील निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढल्याने भारतीय जनता पक्षाचे धाबे दणाणले आहेत. महाविकास आघाडीने एकत्रितपणे आगामी काळात निवडणुका लढल्या तर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत मात खावी लागणार हे ओळखून भाजपने भेदनितीला सुरू केली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा रेटून त्यांनी स्थानिक शिवसैनिकांना संभ्रमात टाकले आहे तर राज्यात कॉंग्रेस सोबत बसलेल्या उध्दव ठाकरे यांना संघटनेच्या मूळ अंजेड्या नुसार यश येईल की नाही याची चाचपणी करणे भाग पडले आहे.

हैदराबाद पॅटर्न

त्याचवेळी एमआयएम आणि वंचित बहुजनचा दुसरा प्रयोग करतानाच येत्या काळात होऊ घातलेल्या औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि नवी मुंबई या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूरावलेल्या शिवसेनेला खिंडीत गाठताना हैद्राबाद पँटर्न औरंगाबाद मध्ये राबविण्याचे नियोजन भाजपने केले आहे. हैद्राबाद मध्ये हिंदू मुस्लिम प्रयोग करणा-या भाजपने ध्रुवीकरणाच्या मुद्यावर महाविकास आघाडीतील नैसर्गिक मतभेदांचा फायदा घेण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे स्वबळाची चाचपणी करणा-या तीनही पक्षांच्या आघाडीसमोर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे आव्हान उभे राहिले आहे.

धरले तर चावते…

येत्या काळात नामांतराच्या मुद्यावरून सत्तेत सोबत असताना नुरा कुस्ती करत मतदारांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतून होत आहे. एकत्र निवडणुका लढल्या तर जागावाटपात मोठ्या बंडखोरीचे संकट या तीन पक्षांसमोर आहे, त्यामुळे आघाडीत राहिले तर चावते आणि सोडले तर पळते अशी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची स्थिती असल्याचे या सूत्रांनी सांगितले. शिवसेनेला सर्वात धास्ती आहे ती मुंबई ठाणे आणि नाशिक या स्थानिक महापालिका निवडणुकांवर याचा परिणाम होवून मतदार दुरावेल याची. अनेक वर्षाची ही सत्ता हातची जाण्याची भिती आहे त्यामुळे अस्मितेच्या मुद्यांचा शोध सुरू झाला आहे असे या सूत्रांनी सांगितले.