अखेर ठरलं;  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे आणि कधी होणार; मंत्रीमंडळ बैठकीत झाला निर्णय

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री अ‍ॅड. अनिल परब, मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

याआधी हे अधिवेशन मुंबईत होणार की नागपूर याबाबत संभ्रम होता. गेल्या बैठकीत ते मुंबईत घ्यायचा निर्णय झाला. त्यावर मंत्रीमडळाने शिक्कामोर्तब केले होते. आता ते किती कालावधीचे असावे आणि कधिपासून किती दिवस याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये हे अधिवेशन दोन दिवसांचे घेतले जावे असा निर्णय झाला.