‘त्या’ उड्डाणपुलाला गणेश नाईकांचे नाव द्या- जितेंद्र आव्हाड

ठाणे बेलापूर मार्गावर उड्डाणपूलाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी फुटेल. मात्र पूल पाहिल्यास ती त्यांच्या व्हाईट हाऊस या कार्यालयाकडे जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली असल्याचे दिसून येते. त्या उड्डाणपुलाला गणेश नाईकांचे नाव द्या अशी उपरोधिक मागणी राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केली. राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस व शिवसेनेत मतमतांतरे असताना नवी मुंबईत आलेल्या मविआच्या नेत्यांमध्ये मात्र एकजूट पाहायला मिळाली.

ठाणे (Thane). ठाणे बेलापूर मार्गावर उड्डाणपूलाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी फुटेल. मात्र पूल पाहिल्यास ती त्यांच्या व्हाईट हाऊस या कार्यालयाकडे जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली असल्याचे दिसून येते. त्या उड्डाणपुलाला गणेश नाईकांचे नाव द्या अशी उपरोधिक मागणी राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केली. राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस व शिवसेनेत मतमतांतरे असताना नवी मुंबईत आलेल्या मविआच्या नेत्यांमध्ये मात्र एकजूट पाहायला मिळाली.

ज्यांना स्व. बाळासाहेबांनी सर्व काही दिले, शरद पवारांनी मान दिला, गणेश नाईकांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या बोनकोडे गावात ते पंतप्रधान मोदींचे नाव घेऊ देत नव्हते. मोदी, शहा हे एकदिवस नेपाळमार्गे पळतील असे वक्तव्य खुद्द गणेश नाईकांनी केले होते. शहराचा विकास करायचा असल्यास त्यांना हटवावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्ता रुंदीकरणाच्या आधारावर एफएसआय दिला आहे. त्याचा फायदा समस्त नवी मुंबईकरांना होणार आहे. हे मविआचे काम आहे नाहीतर हे आम्ही केलं म्हणून सांगायला डोमकावळे येतील असा टोमणा त्यांनी लगावला. तुर्भे येथील डी आर पाटील यांचे घराणे संपवण्याचा प्रयत्न नाईकांनी केला. त्यांची भाषा ऐकली की ते वैराग्याकडे जात असल्याचे जाणवते. नाईकांना नवी मुंबईच्या विकासाची काहीही पडलेली नाही कुठून काय येतंय व ५ टक्के मिळतायत इतकंच त्यांना माहीत आहे. मोरबे धारणाशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषय नाही. ते बांधले कोणी व कोणामुळे मिळाले हे सर्वांना ठाऊक आहे. गणेश नाईक आल्यावर पवार त्यांना बाजूला बसवत मात्र भाजपाच्या मिटिंगमध्ये खुर्ची देखील त्यांना मिळाली नाही. दिल्लीत शेतकरी अद्यापही लढा देत आहेत. शेतकरी कायद्याविषयक बिल लोकसभेत एका तासात कसे काय पास झाले? एपीएमसी उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव असून भाजपा हा शेठजींचा पक्ष हे त्यांनी सिद्ध केले अशी टीका आव्हाड यांनी केली.

यावेळी मत्स्य व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख म्हणाले की, बाबासाहेबांचे संविधान संपवण्याचे कारस्थान केंद्र सरकारचे आहे. पेट्रोल डिझेल, गॅस व धान्याचे दर वाढले आहेत. महागाई आ वासून उभी आहे. चिनी माल घेऊ नका असे सांगितले जाते मात्र चीनवरून येणारा माल थांबलाच कुठे? अर्णब गोस्वामीचे चाट पाहिल्यावर लक्षात येते. देशाच्या संरक्षणविषयक बाबी उघड कशा होतात असा सवाल त्यांनी केला. खंडणी व अपहरण करून जर कोणती पार्टी तयार झाली असेल तर ती भाजपा आहे. ज्या राज्यात नदी व समुद्र नाही त्यांनी प्रकल्प उभारले, मात्र आपण सर्वगुण संपन्न असताना ते उभारू शकलो नाही. येत्या महिनाभरात बेकायदेशीर मासेमारीसाठी कायदा येणार आहे. त्यामुळे कोणाची बेकायदेशीरपणे मासेमारी करण्याची हिंम्मत होणार नाही, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल असेही ते म्हणाले.

नवी मुंबईतील मच्छिमारांना जुनी नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, उमेदवारी मिळण्यापेक्षा मविआ कशी निवडून येईल याकडे लक्ष द्या. धनशक्तीचा वापर केला जाईल. राज्यात जनशक्ती जिंकते हे आपण दाखवून द्यायचे आहे. एक वर्ष पूर्ण झालं मात्र विरोधकांना।सरकार पडण्याची स्वप्ने पडत आहेत. आमचे संजय राऊतच भारी आहेत. महाराष्ट्र सदन नवी मुंबईत उभरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ससून डॉक मुंबईतून नवी मुंबईत आणावे. पार्किंगमध्ये इमारती उभारण्यास आमचा विरोध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पर्यावरण प्राधिकरणाचे राज्याचे अध्यक्ष विजय नाहटा म्हणाले की, इथल्या नेत्यांचे कॉन्ट्रीब्युशन शून्य आहे. हे शिल्पकार नाहीतर मिस्टर ५ टक्के आहेत अशी टीका त्यांनी नाईकांवर केली. यावेळी खा. राजन विचारे, राष्ट्रवादीचे निरीक्षक प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, राष्ट्रवादीचे।जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे अनिल कौशिक व संतोष शेट्टीं यांची भाषणे झाली. यावेळी माजी खा. आनंद परांजपे मविआचे माजी नगरसेवक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

आ. मंदा म्हात्रे विरुद्ध नाईक लढाई
चौकट-: सध्या मंदा म्हात्रे विरूढ गणेश नाईक अशी लढाई सुरू आहे. आपण म्हात्रे या जिंकाव्यात अशी प्रार्थना करूयात.त्या आपल्याला मदत करणार नाहीत मात्र भगिनी आहेत म्हणून म्हणतोय असे आव्हाडांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

गावठाणांना देणार ४ एफएसआय
चौकट-: गावठाण सीमांकान करून गावठांना ४ एफएसआय देण्याचे काम केले जाईल असे आश्वासन आव्हाड यांनी दिले. नाईक मंत्री असताना का बरं हे केले नाही. आगरी समाजाचा विचार का केला नाही.

ससून डॉक नवी मुंबईत?
ससून डॉकची सीमा नौदलाच्या हद्दीत येत असल्याने भारतीय नौदलाने राज्य शासनाला डॉक स्थलांतरित करण्याची सूचना केली आहे. त्याविषयी बोलताना आव्हाड म्हणाले ऐरोलीत मोठी जागा आहे. पाण्याची खोली चांगली असल्यास मोठ्या बोटी येऊ शकतात का हे तपासून ससून डॉक येथे स्थलांतरित करावा. त्यामुळे नवी मुंबईतील मच्छिमारांना रोजगार उपलब्ध होईल.