कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला ? नाना पटोलेंनी मोदी सरकारला विचारला सवाल

कोविशिल्डच्या दोन डोसमधील(Gap Between Two Doses Of Covishield) अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय १३ मे रोजी तज्ञ गटांच्या शिफारशीवरून घेतल्याचे खोटेच सांगितले गेल्याचे आता उघड झाले आहे

    मुंबई: कोरोना(Corona) महामारीचे संकट हाताळण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत लसीकरणाचे(Vaccination) धोरण मोदी सरकारकडे(Modi Government) नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केला आहे.

    कोविशिल्डच्या दोन डोसमधील(Gap Between Two Doses Of Covishield) अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय १३ मे रोजी तज्ञ गटांच्या शिफारशीवरून घेतल्याचे खोटेच सांगितले गेल्याचे आता उघड झाले आहे मग हा निर्णय मोदी सरकारने कोणाच्या सांगण्यावरून व कशाच्या आधारावर घेतला याचा खुलासा झाला पाहिजे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

    सरकारचा दावा धादांत खोटा
    यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, ज्या शास्त्रज्ञांचा हवाला देत मोदी सरकारने लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते तो सरकारचा दावा धादांत खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

    दोन लसीमधील अंतर वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशिल्ड लसीबद्दलच का घेतला गेला? लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली आणि त्यामुळे मोदींची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून हा सारा खाटाटोप केला आहे का ? लसीकरण मोहिमेत मोदी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठीच हा निर्णय घेतला नाही ना! असे प्रश्न उपस्थित होत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

    लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही
    लसीमुळे कोरोनापासून होणारा धोका कमी होण्यास मदत होते हे अनेक तज्ञांनी सांगितले आहे. मात्र मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींची आवश्यक मागणी लस उत्पादक कंपन्याकडे न करताच आधी ४५ वर्षांवरील आणि नंतर १८ वर्षावरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्य सरकारकडे लसींचा पुरवठाच योग्य त्या प्रमाणात केला गेला नाही. दोन कंपन्यांवरच विसंबून राहिल्याने लसीकरण मोहिम फसली.

    जीवीताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा
    घरोघरी जावून लस द्यावी असे मा. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी व खा. राहुलजी गांधी यांनीही सर्वांना मोफत लस देण्यासंदर्भात मोदी सरकारला पत्र पाठवून सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्याकडे मोदींनी दुर्लक्ष केले, आतातरी त्यांचा सल्ला ऐकून लोकांच्या जीवीताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा, असेही पटोले म्हणाले.