नारायण राणे आणि मुख्यमंत्री प्रथमच व्यासपीठावर एकत्र समोरासमोर येणार; राजकीय वर्तुळात उत्सुकता!

नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांच्या जनादेश यात्रे दरम्यान त्यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यावर सरकारने त्यांना केलेली अटक या घटनांचा या भेटीला संदर्भ आहे. त्यामुळे दोघांकडून एकमेकांना काय आणि कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सा-या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

  मुंबई: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परुळे येथील सिंधुदूर्ग विमानतळ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न होत आहे. कोविड-१९ च्या निर्बंधामुळे हा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सार्वजनिक नसून केवळ निमंत्रितांसाठी आहे.

  मुख्यमंत्री- राणे प्रथमच एकत्र समोरासमोर येणार
  विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय लघु सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे प्रथमच व्यासपीठावर एकत्र समोरासमोर येणार आहेत. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांच्या जनादेश यात्रे दरम्यान त्यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यावर सरकारने त्यांना केलेली अटक या घटनांचा या भेटीला संदर्भ आहे. त्यामुळे दोघांकडून एकमेकांना काय आणि कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सा-या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

  पालकमंत्र्याकडून परिपूर्ण आढावा
  दरम्यान, सिंधुदूर्ग विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग विमानतळावर प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकार्पण सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था कशी राहणार? कार्यक्रम कुठे होणार? याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हामुख्य कार्यकारी अधिकारी प्रजत नायर, एमआयडीसी व आयआरबी कंपनीचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत परिपूर्ण आढावा घेतला.

  ७० सीटर विमानाचे बुकिंग ऑनलाईन सुरू
  एअर अलायन्स कंपनीने ७० सीटर विमानाचे बुकिंगसुद्धा ऑनलाईन सुरू केले आहे. सध्या तरी दिवसातून एकच विमान सिंधुदूर्ग ते मुंबई, मुबंई ते सिंधुदूर्ग असा प्रवास करणार आहे. एकूणच २० वर्षानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे, त्या सोहळ्याकडे राज्यातील सा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.