ज्यांनी कुणाच्या कानशिलात दिली नाही, त्यांनी धमकीची भाषा करू नये : खा नारायण राणेंचा शिवसेना नेत्यांवर प्रहार!

शिवसेना भवनाच्या मुद्द्यावरून त्यांनी खा संजय राऊतांना फटकारले. शिवसेना भवनचा इतिहास राऊतांना काय माहीत आहे काय? त्यावेळी शिवसेनेत तरी होतात का? तेव्हा तुम्ही ‘लोकप्रभात’ काम करत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होता. त्यावेळचे अंक माझ्याकडे आहेत. तुम्ही शिवसेनाप्रमुखांवर कोणत्या भाषेत टीका केली ते छापू का ‘प्रहार’मध्ये इशाराही त्यांनी दिला.

    मुंबई : ज्यांनी कधी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांनी धमकीची भाषा करू नये, असे सांगत स्वत:ला सांभाळा. तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही, असा इशारा नारायण राणे यांनी शिवसेना नेत्याना दिला आहे. शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आज पुन्हा सिंधुदूर्गातही नारायण राणे आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे.

    एवढे आम्ही शिवसेनेतच शिकलो

    ते म्हणाले की, परवा झालेल्या हल्ल्यातील हात आणि पाय विसरणार नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले. त्यांना सोडणार नाही. शिवथाळी कोण कुणाला देते हे पाहूच, असे सांगत प्रसादाची परतफेड कशी करायची एवढे आम्ही शिवसेनेतच शिकलो आहे. परतफेड योग्यवेळी कशी करायची हे आम्हाला माहीत आहे असे राणे म्हणाले.

    ते म्हणाले की, तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, तर नॉनव्हेज थाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे स्वत:ला सांभाळा नाही. नाहीतर विनाकारण तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे तुम्हाला समजणारही नाही, असा इशारा नाव न घेता सेना नेत्यांना राणे यांनी दिला. ते म्हणाले की, राणे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत. महिलांवर ज्यांनी हात उचलले त्यांची नावे आमच्याकडे आली आहेत. त्यांना पाहून घेऊ. या लोकांना शिवथाळी दिल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

    पक्ष कार्यालयाइतकेच शिवसेना भवनचे महत्व

    शिवसेना भवनाच्या मुद्द्यावरून त्यांनी खा संजय राऊतांना फटकारले. शिवसेना भवनचा इतिहास राऊतांना काय माहीत आहे काय? त्यावेळी शिवसेनेत तरी होतात का? तेव्हा तुम्ही ‘लोकप्रभात’ काम करत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होता. त्यावेळचे अंक माझ्याकडे आहेत. तुम्ही शिवसेनाप्रमुखांवर कोणत्या भाषेत टीका केली ते छापू का ‘प्रहार’मध्ये इशाराही त्यांनी दिला.

    माझ्या सारख्या शिवसैनिकांनी स्वत: वर्गणी दिली आणि वर्गणीही जमवून दिली. तेव्हा शिवसेना भवन उभे राहिले. तुमचे योगदान तरी काय? तुम्ही नोकरीला आला. तुम्ही कधी शिवसैनिक आणि नेता झालात हे सांगणार नाही. तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काय केले? कुणाच्या कानफडात मारली का कधी?, इतर पक्षांची जशी कार्यालये असतात तेवढेच महत्व शिवसेना भवनचे आहे, असं ते म्हणाले.

    हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये

    ते म्हणाले की, वैभव नाईकने काही हल्ला केला नाही. तुमच्याकडे फुटेज असेल तर पाहा. उलट तो पळून गेला. तो कसला हल्ला करतोय, असेही ते म्हणाले. आजची शिवसेना राहिली नाही. आजची शिवसेना बाळासाहेबांचीही नाही आणि जुन्या शिवसैनिकांचीही नाही. ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची शिवसेना आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये, अशी टीकाही त्यांनी केली.