एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज; नारायण राणेंनी संशयकल्लोळ सुरू केल्यांनतर भाजप नेत्यांचे ‘आगीत तेल’ टाकणारे वक्तव्य

चंद्रकांत पाटील यांनी माध्यामांशी बोलताना दावा केला की, नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत राणेही होते. राणे छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, दालन कर्माचारी मिळतात पण या मंत्रीमंडळात ‘रिमोट कंट्रोल’ अन्य ठिकाणी आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

  मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे(Eknath shinde) शिवसेनेत(shivsena) नाराज असल्याचे सांगत महाविकास आघाडीत संशयकल्लोळ सुरू करून दिल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही घुसमट होत असल्याचे शिंदेनी नारायण राणेंच्या कानात सांगितले असेल तर त्यावर मी भाष्य का करावे असे म्हणत संभ्रम वाढेल अशी काळजी घेतली आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. त्यांना लाल दिवा आणि कॅबिनेटचा स्टाफ मिळतो. पण रिमोट कंट्रोल दुसरीकडेच आहे, असा दावा करत महाविकास आघाडीतील मंत्र्याबाबत संशय वाढविण्याचा प्रयत्न केल आहे.

  राणे सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य

  चंद्रकांत पाटील यांनी माध्यामांशी बोलताना दावा केला की, नारायण राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत राणेही होते. राणे छाती ठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, दालन कर्माचारी मिळतात पण या मंत्रीमंडळात ‘रिमोट कंट्रोल’ अन्य ठिकाणी आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

  स्वतंत्रच लढणार ही भूमिका कायम

  राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार किती वेळ चालेल माहीत नाही. पण भाजपसोबत आलेल्या या सरकारमुळे दुखावलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही नक्की न्याय देऊ. पुढील निवडणुका या स्वबळावरच लढवू, असे सांगत शिवसेना आमच्या सोबत येईल हा जर तरचा प्रश्न आहे. पण आम्ही स्वतंत्रच लढणार ही भूमिका कायम आहे, असे ते म्हणाले.

  मागास आयोगाचे काम सुरू करा

  मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजी राजे सरकारची भूमिका समजून घेतात असे सत्ताधारी म्हणतात. मग नांदेडचे आंदोलन भाजप पुरस्कृत होते असे कसे म्हणता? असा सवाल त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना केला. मागास आयोगाचे काम सरकार सुरू का करत नाही? अशावेळी आंदोलन करू नका असे सरकार कसे म्हणू शकते?, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

  दानवेची ग्रामीण बोली भाषा

  यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील प्रतिक्रियेवर सारवासारव केली. रावसाहेब दानवे हे ग्रामीण भागातील नेते आहेत. त्यांची ग्रामीण बोली भाषा आहे. मोदींबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ हा अनादर करणे असा होत नाही, असा दावा त्यांनी केला.

  सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी

  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. यशोमती ठाकूर यांच्याप्रमाणेच अन्य मंत्र्यांचीही स्थिती हीच आहे. सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी होत आहे, असा दावाही त्यांना केला. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना रोज लाथाबुक्क्यांचा मार खावा लागत आहे. स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिलाच नाही. मिळेत तेव्हा लाथा मारण्याचे काम राष्ट्रवादीने सुरू ठेवले आहे. त्यांचा समन्वयाशी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राचा विचका करत आहे, अशी टीका त्यांनी केली.