नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही : विनायक राऊत

  मुंबई : उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तसेच चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतू मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आलं, असेही ते म्हणाले.

  विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, चिपी विमानतळावरून नियमितपणे हवाई वाहतूक करण्याचं निश्चित झालं. कालच उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत सकाळी ११ वाजता चर्चा केली आणि काल उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला.

  ज्योतिरादित्य यांच्याशी माझं बोलणं झालं. ते माझ्याशी मराठीतच बोलतात. विनायकभाऊ मी स्वत: येणार आहे. चिपीवरून नवी मुंबईत जाणार आहे. काल ११ वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला १२ वाजता फोन केला. आम्ही ९ तारीख फिक्स केली, असे त्यांनी सांगितले.

  सिंधुदुर्ग आणि मुंबईकरांना सोयीस्कर वेळ ठरेल अशीच वेळ अदानी ग्रुपशी चर्चा करून घेतली आहे. मी एअरलायन्सला भेटून विमानतळ सुरू करण्यास सांगितलं. त्यांनी ७ ऑक्टोबरपासून विमान उड्डाण सुरू करायला तयार आहोत असं सांगितलं होतं. तसं पत्रं दिलं होतं. त्या पत्राची माहिती सर्वांना दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.

  चिपी विमानतळ प्रकल्प महाराष्ट्राचाच

  चिपी विमानतळ महाराष्ट्र एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे. आता जे बडेजाव मारतात फुशारकी मारतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही. तुम्ही कोण सांगणारे. तुम्हाला कोणी अधिकार दिला. काही माहीत नसेल तर चार लोकांना विचारा. सोयीसाठी अमित शहांना विचारा. तुम्हाला काय अधिकार? काल टिंगूमिंगू सांगत होते बाप असावा तर असा. पण तो आयत्याबिळावरचा नागोबा नसावा अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी राणे कुटुंबावर केली.