कोणाला गोमुत्र शिंपडायचे शिंपडू द्या, कोणाला प्यायचे त्याला पिऊ द्या, त्यात माझा काय संबंध? गुन्हे दाखल केल्यानंतर नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यावरून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्या बाबत ते म्हणाले की ते सारे जनतेच्या सेवेसाठी आशिर्वादासाठी आम्ही पाहून घेवू मी समर्थ आहे असे सांगत ते म्हणाले की, हे करणारांनी आपल्या डोक्यावर दिल्लीत कोणीतरी बसले आहे हे देखील लक्षात ठेवावे असा इशाराही दिला.

    मुंबई : केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी गुरुवारी सायंकाळी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. त्यानंतर आज कोकणात यात्रेच्या पुढील टप्प्याची सुरूवात करण्यासाठी निघताना राणे यानी भल्या सकाळी पत्रकार परिषद घेत याविषयी आक्रमक भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांनी या विषयाला महत्व दिल्यावरून पत्रकारांना देखील सुनावले.

    महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळे स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही पत्रकारांचा आदर करतो, आम्हालाही पत्रकारांचे मार्गदर्शन मिळावे, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. पण सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का असा उव्दिग्न आणि संतप्त सवाल त्यानी केला.

    राणे पुढे म्हणाले, कोणासमोर मला नतमस्तक व्हावेसे वाटते, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचे शिंपडू द्या, कोणाला प्यायचे त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडले? काय दूषित झाले होते?

    यावेळी नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुरावस्थेबाबतही संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, स्मारकाबद्दल एवढाच आदर आहे तर त्याची आजची काय स्थिती आहे ते पहा दलदलीत हे स्मारक आहे तेथे जाताना चिखल असल्याने पँन्ट वर करून मला जावे लागले. मी अनेक स्मारके पाहिली, त्याच्या व्यवस्था आणि सुशोभिकरण पाहिले पण या ठिकाणी काही व्यवस्थित दिसले नाही. साहेबांचे छायाचित्रही निट दिसत नाही. गोमूत्र शिंपडण्यापेक्षा हे स्मारक कसे जागतिक किर्तीचे होईल या कडे लक्ष द्यायला हवे. हे मी करेन जेच माझे त्याना उत्तर असेल असे ते म्हणाले. ते म्हणाले की स्मारक शुध्द करण्यासाठी ब्राम्हण लागतो तो देखील नव्हता मला सांगितले असते तर माझ्याकडे हवे तितके आहेत, आणि त्यासोबतच मन शुध्द करायला पाहीजे असे राणे म्हणाले.

    यावेळी झालेल्या प्रश्नोत्तराना देखील राणे यानी आक्रमकपणे उत्तर दिले, मुंबईतील ३२ वर्षांचा बकालपणा घालवायचा असेल तर महापालिकेत सत्तांतर आवश्यक असल्याचे नारायण राणे म्हणाले. राज्य सरकारने कोरोनाचा विषय देखील नीट हाताळला नसून त्याना पूर्णत: अपयश आले आहे असे सांगत त्यानी सिंधुदूर्गात कोरोना रुग्णांलयात दाताचे आणि कानाचे डॉक्टर उपचार करत असल्याचे सांगितले. कालच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यावरून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्या बाबत ते म्हणाले की ते सारे जनतेच्या सेवेसाठी आशिर्वादासाठी आम्ही पाहून घेवू मी समर्थ आहे असे सांगत ते म्हणाले की, हे करणारांनी आपल्या डोक्यावर दिल्लीत कोणीतरी बसले आहे हे देखील लक्षात ठेवावे असा इशाराही दिला.