नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेने मुंबई निघाली ढवळून; आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा सुरू 

केंद्रीय मंत्री राणे यांना मुंबई महापालिकेचा अनुभव आहे. ते बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. आज राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेने मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. राणे यांचा आगामी पालिका निवडणुकीत भाजपाकडून वापर होणार आहे. भाजपाच्या राणे अस्त्राला शिवसेना कसे प्रत्युत्तर देणार हे महत्वाचे आहे. पालिका निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

  मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईत निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेने मुंबई ढवळून निघाली. महापालिकेत खळबळ निर्माण झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलट सुलट राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

  पंतप्रधान मोदी यांचा नव्या मंत्रिमंडळात केंद्रात मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली होती. आज सकाळपासून ही यात्रा सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने भाजपाने मुंबईत आज शक्ती प्रदर्शन केले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यापेक्षा कोरोनाच्या लसींचा तुटवडा मुंबईत निर्माण आहे, त्यामुळे केंद्र सरकार कडून मुंबईसाठी जास्ती जास्त लसी मिळवून ध्या, लोकांचा जीव वाचवायचे सोडून, यात्रेसाठी गर्दी जमवून लोकांचे जीव धोक्यात घालत आहात असा टोला महापौरांनी लगावला.

  टीका करताना विचार करा

  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असताना अशा यात्रा काढून गर्दी जमविणे योग्य नाही, यात्रेत कुठेही कोरोनाचे नियम पाळले जाताना दिसत नाहीत. कोरोना नियंत्रणात महाराष्ट्र आणि मुंबईला पहिल्या क्रमांकावर आणले, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे श्रेय आहे. त्यामुळे राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना विचार करावा असा सल्लाही महापौरांनी राणे यांना दिला.

  मुंबईला फायदा

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात भौगोलिक आणि सामाजिक समतोल साधला असल्याची भावना मुंबई महानगर पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री राणे यांचे खाते देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी महत्वाचे आहे. रोजगार निर्माण करणारे हे खाते आहे. या यात्रेचा मुंबईसाठी नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास गटनेते शिंदे यांनीं व्यक्त केला आहे.

  यात्रा राजकीय नाही

  पंतप्रधान मोदी यांनी जन आशीर्वाद यात्रा काढण्याच्या सूचना नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्याना दिल्या आहेत. बहुजन समाजाची सुखदुःखे समजून घ्यावेत, त्या प्रश्नांचा त्यांनी अभ्यास करावा यासाठी ही यात्रा आहे. ही यात्रा राजकीय नाही आणि पालिका निवडणुकीसाठी नाही. देशभर या यात्रा सुरू आहेत असे मत व्यक्त केले आहे भाजपाचे प्रवक्ते आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी.

  काँगेसला राणेंचा काय फायदा झाला?

  काँग्रेसचे पालिकेतील गटनेते रवी राजा यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले केंद्रीय मंत्री झाल्यामुळे राणे यांनी ही यात्रा काढली आहे. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर या यात्रेचा परिणाम होईल, असे मला वाटत नाही. राणे हे काँग्रेसमध्ये होतेच ना. काँगेसला काय फायदा झाला असा सवाल गटनेते रवी राजा यांनी केला.

  निवडणूक होणार अटीतटीची

  केंद्रीय मंत्री राणे यांना मुंबई महापालिकेचा अनुभव आहे. ते बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. आज राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेने मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. राणे यांचा आगामी पालिका निवडणुकीत भाजपाकडून वापर होणार आहे. भाजपाच्या राणे अस्त्राला शिवसेना कसे प्रत्युत्तर देणार हे महत्वाचे आहे. पालिका निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.