निधीअभावी रखडले मुंबई – गोवा महामार्गाचे काम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र केले दाखल

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे(Potholes On Mumbai Goa Highway) वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, असा दावा करणारी जनहित याचिका मूळचे कोकणातील असलेले ॲड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सोमवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी(Mumbai Goa Highway Case Hearing) पार पडली.

    मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील(Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाचे काम पुरेशा निधीअभावी रखडले असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) (NHAI) मुंबई उच्च न्यायालयात(Mumbai High Court) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला. तसेच रस्त्यावर खड्डे असल्याचे मान्य करत महामार्गावर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटींचा निधी आवश्यक असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून नमूद करण्यात आले आहे.

    मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, असा दावा करणारी जनहित याचिका मूळचे कोकणातील असलेले ॲड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सोमवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने व्यवस्थापक आणि प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. तेव्हा पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटरचा रस्ता एनएचएआयच्या अखत्यारित येत असून या पट्ट्यात रस्त्याला खड्डे असल्याचे प्राधिकरणाने मान्य केले आहे. तसेच पतपुरवठादरांकडून पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण होत नसल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जर महामार्गाचा निधी अखंडितपणे आणि वेळेवर मिळत राहिला तर महामार्गाचे काम ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ६७ कोटींची आवश्यकता असून आमच्या अखत्यारितीतील महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटींचा निधी आवश्यक असल्याचेही फेगडे यांच्यावतीने प्रतिज्ञापात्रातून नमूद करण्यात आले आहे.

    तसेच मान्सूनआधी महामार्ग वाहतूकीसाठी सुस्थितीत होता. मात्र मुसळधार पाऊस आणि वजनदार वाहनांची रोजची ये-जा यांमुळे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आणि पाणी साचले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे केलेले काम पुन्हा नव्याने करावे लागत असून या काळात तयार झालेल्या रस्त्याची देखभाल कऱणेही अवघड काम बनले आहे. नुकतेच तयार झालेल्या खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉक टाकून तो बुजवण्याचे काम हाती घेतले असून त्याची देखभाल आणि दुरूस्तीचे कामही प्राधिकरणाने नेमलेले अभियंते वेळोवेळी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच रस्त्यावर कोणताही अपघात झाल्यास दोन रुग्णवाहिन्या खारपाडा आणि सुखेळी या ठिकाणी पूर्ण वेळ ठेवण्यात आल्या असल्याचेही शेवटी नमूद करण्यात आले आहे.