Navy's Sea Harrier aircraft on the shores of the Bandra Bandstand; Photo shared by Aditya Thackeray

मुंबई :  भारतीय नौदलात शौर्याचे साक्षीदार असलेले निवृत्त सी हॅरिअर लढाऊ विमान वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्वर बसविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यटन सौंदर्यात भर पडणार असून लढाऊ विमानांचा इतिहासही सर्वसामान्य मुंबईकरांना कळणार आहे.

मुंबईच्या पर्यटनात भर पडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलातर्फे देण्यात आलेले सी हॅरिअर विमान वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डवर मुंबई महानगरपालिकेतर्फे बसविण्यात आले. या विमानाचे  औपचारिकरीत्या हस्तांतरण पत्र  भारतीय नौदलाचे  फ्लॅग ऑफिसर ऑफ महाराष्ट्र श्रीनिवासन यांच्या हस्ते मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे एका छोटेखानी समारंभात देण्यात आले.

याप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया, उपायुक्त पराग मसुरकर, एच /पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विनायक विसपुते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ विमान हे मुंबईला भेट म्हणून मिळाले आहे. मुंबईसाठी ही अनोखी भेट असून यामुळे मुंबईच्या पर्यटन सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. भारतीय नौदलाकडून निवृत्त झालेल्या आय.एन.एस. विराट युध्दनौकेवर हे विमान तैनात होते. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाला दरवर्षी या परिसरात शालेय विद्यार्थ्यांचे संचलन होत असते. त्यामुळे या परिसरात भारतीय सामर्थ्य दाखविणारे हे विमान ठेवण्यात आले आहे.