वानखेडे-कंबोज यांची भेट? मंत्री नवाब मलिक करणार गौप्यस्फोट

नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या छाप्यात भाजपशी संबंधित व्यक्ती होत्या याची चित्रफीत दाखवली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपचा या छाप्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेतानाची आणि काही काळाने त्यांच्या नातेवाईकांसोबत एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडतानाची चित्रफीत नवाब मलिक यांनी दाखविली.

    मुंबई : एनसीबीने क्रुझवर कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईनंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईची सगळीकडे चर्चा होत असताना ही कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना केला होता. यानंतर मलिक आणखी एक गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत.

    एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित कम्बोज यांचे मेहुणे आहेत. यासोबत अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आलं आहे. एनसीबी कार्यालयात देखील या तिघांना आणण्यात आलं होतं. मग त्यांना सोडण्याचे आदेश कुणी दिले. आमची मागणी आहे की, NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खुलासा करावा करावा. क्रुझवरील छापेमारीचं हे प्रकरण प्लॅन करुन केलेलं असून बोगस आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

    नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या छाप्यात भाजपशी संबंधित व्यक्ती होत्या याची चित्रफीत दाखवली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपचा या छाप्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेतानाची आणि काही काळाने त्यांच्या नातेवाईकांसोबत एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडतानाची चित्रफीत नवाब मलिक यांनी दाखविली.

    क्रुझवर १३०० लोकांवर धाड टाकण्यात आली. ही धाड १२ तास सुरू होती. त्यातील ११ लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर अकरा जणांना NCB च्या कार्यालयात आणले होते परंतु त्यापैकी तीन लोकांना सोडण्याचा आदेश दिल्लीवरून नेत्यांनी केल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

    रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्याचे वडील आणि काका सोबत होते. या तीन व्यक्तींचे नातेवाईक एनसीबीच्या कार्यालयात आले कसे, असा सवाल करत रिषभ सचदेवाचे वडील आणि काका व समीर वानखेडे यांच्या संभाषणाचे तपशील मुंबई पोलिसांनी तपासल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही नवाब मलिक म्हणाले. हे सगळं न्यायालयात सिद्ध होईलच, परंतु जनतेच्या न्यायालयातही आले पाहिजे म्हणून हे प्रकरण मांडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.