‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सर्वच ठिकाणी आघाडी नाही, काही ठिकाणी स्वबळावर’ नबाब मलिक यांची माहिती

राज्यात पुढील वर्षांत मुंबईसह २३ महानगरपालिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांची तयारी, कुठे मित्र पक्षांशी आघाडी, कुठे स्बळावर लढता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

  मुंबई : राज्यात पुढील वर्षी २७ जिल्हा परिषद आणि २३ महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी सर्वच ठिकाणी शिवसेना, काँग्रेसबरोबर आघाडी शक्य नसेल तरी काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी दोन किंवा तीन पक्षांची आघाडी करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. याबाबत काल सायंकाळी सुमारे तीन तासांपेक्षा जास्त काळ झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

  सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा

  मलिक यानी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्य़ाद्री अतिथिगृहावर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात सत्तेचे वाटेकरी असणाऱ्या शिवसेना-काँग्रेससोबत स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आघाडी करण्यासंबंधी चर्चा झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आदी मंत्री उपस्थित होते. बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

  गरज असेल तिथे तिन्ही पक्ष एकत्रित

  राज्यात पुढील वर्षांत मुंबईसह २३ महानगरपालिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांची तयारी, कुठे मित्र पक्षांशी आघाडी, कुठे स्बळावर लढता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक मंत्र्याकडे एका जिल्ह्य़ाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्वच ठिकाणी आघाडी होईल असे नाही, गरज असेल तिथे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील, स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.

  कटकारस्थाना विरोधात कायदेशीर लढाई करणार

  या बैठकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महामंडळे, मंडळे, शासकीय समित्यांच्या वाटपाबाबत चर्चा झाली. महामंडळांवर नियुक्त्यांसाठी नावांवर चर्चाही झाली. १५ दिवसांत नावे जाहीर केली जातील, असे मलिक म्हणाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहे, त्याबाबत कायदेशीर लढाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.