नवाब मलिकांची 11 वाजता खळबळजनक पत्रकार परिषद; आज कोणता गौप्यस्फोट करणार?

नवाब मलिक आजच्या पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नवाब मलिक आज 11 वाजता ही खळबळजनक पत्रकार परिषद घेणार आहेत.

    मुंबई : एनसीबीच्या पथकाने मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर छुपी कारवाई करत क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळासह बॉलिवूड विश्वातही खळबळ उडाली. कारण एनसीबीने या क्रुझवरून अभिनेता शाहरूख खानच्या मुलासह 8 जणांना ताब्यात घेतलं.

    दरम्यान या कारवाईवर अनेक प्रतिक्रीया उमटत असताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर काही गंभीर आरोप केले. एनसीबीच्या या कारवाईनंतर मलिकांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीसह या क्रुझ कारवाईचे नेतृत्व करणारे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले. ही सगळी कारवाई बोगस असल्याचा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला होता. तर एनसीबीने क्रुझवरून 11 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यातील 3 जणांना एनसीबीने सोडल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता.

    याप्रकरणी नवाब मलिकांनी आत्तापर्यंत दोन पत्रकार परिषद घेतल्या. तर ‘एनसीबीची आणखी एक पोलखोल’ या विषयावर मलिक आज तिसरी पत्रकार परिषद घेणार आहेत. या आधी झालेल्या 2 पत्रकार परिषदेत मलिकांनी खळबळजनक दावे केले होते.

    याआधी मलिक म्हणाले होते की सोडुन दिलेल्या 3 जणांत भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवचा देखील समावेश होता आणि भाजप नेत्याचे फोन गेल्यावर त्याची सुटका करण्यात आली. इतकंच नाही तर मोहित कंबोज आणि समीर वानखेडेंची 7 ऑक्टोबरला भेट झाली होती आणि त्याचे पुरावे लवकरच सादर करणार असा गौप्यस्फोटही मलिक यांनी केला होता.

    त्यामुळे नवाब मलिक आजच्या पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नवाब मलिक आज 11 वाजता ही खळबळजनक पत्रकार परिषद घेणार आहेत.