नायर हॉस्पिटलमध्ये मानसिक समुपदेशनासह सुरु आहे कोरोना रुग्णांवर उपचार

मुंबई :मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले आणि भीतीपोटी पोटात गोळा तयार झाला. आता आपले काय होणार ही भीती मनात घेऊनच मी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. डॉक्टरांशी बोललो आणि पुढच्या क्षणाला मला आपण

मुंबई : मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले आणि भीतीपोटी पोटात गोळा तयार झाला. आता आपले काय होणार ही भीती मनात घेऊनच मी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. डॉक्टरांशी बोललो आणि पुढच्या क्षणाला मला आपण बरे होणार, असा विश्वास निर्माण झाला. नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून औषधांबरोबरच समुपदेशनाचा देण्यात येणारा डोस माझ्यासह अनेक रुग्णांना नवे आयुष्य देत असल्याची भावना कोरोनावर मात केलेल्या एका रुग्णाने व्यक्त केली. 

कोरोनाची लागण झालेले रुग्ण हे प्रचंड तणावाखाली वावरत असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नायर हॉस्पिटलमधील शवागृहामध्ये कार्यरत असलेल्या माणसाला काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांच्या मनात आपण मृत्यूच्या दारात असल्याची भावना निर्माण झाली. आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबालाही क्वारंटाईन व्हावे लागणार अशी भीती त्यांना वाटू लागली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते नायर हॉस्पिटलमध्येच दाखल झाले. वॉर्डमध्ये जाताना त्यांच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. मात्र हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वॉर्डमध्ये आल्यानंतर प्रत्येक रुग्णाची चौकशी करण्यास सुरुवात केली. पण ही फक्त चौकशी नव्हती तर तो होता समुपदेशनाचा डोस. डॉक्टरांनी रूग्णांची मानसिक अवस्था लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. हा संवाद पूर्ण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यासह वॉर्डमधील सर्व रुग्णांना दिलासा मिळाला. आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. समुपदेशन आणि रुग्णांना देण्यात येत असलेल्या औषधोपचाराच्या परिणामामुळे अवघ्या तीन दिवसांतच त्यांना दिलासा मिळाला. परंतु त्यापूर्वी कोरोनारुपी राक्षसाबद्दलची मनात असलेली भीती डॉक्टरांनी दूर केल्यामुळेच त्याचा सामना करणे शक्य झाल्याचे त्या कर्मचाऱ्याने  सांगितले.  डॉक्टरांनी केलेल्या समुपदेशनामुळे आता मी स्वतः अनेकांना कोरोनाबाबत माहिती देऊन लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नायर हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी हे उच्च रक्तदाबाने त्रस्त असूनही या समुपदेशनामुळे त्यांना आजाराचा सामना करण्याची प्रेरणा मिळाली, असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना योद्धा असलेले आरोग्यसेवक, पोलीस, बेस्ट कर्मचारी यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्धांसाठी विशेष वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या वॉर्डची जबाबदारी डॉ. उन्नती देसाई यांनी स्वतः स्वीकारली आहे. त्यामुळे या वॉर्डमध्ये येणाऱ्या प्रत्येक कोरोना योद्धयाला डॉ. देसाई यांच्याकडून प्रथम समुपदेशनाचा डोस देण्यात येत आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेकजण हे ठणठणीत बरे होऊन घरी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाची लागण झालेले रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये तर त्यांचे कुटुंब क्वारंटाईन सेंटरमध्ये असतात. त्यामुळे रुग्ण प्रचंड तणावाखाली असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे असते. कोव्हीड बरा होणारा आजार आहे. तेच आम्ही समुपदेशनामध्ये करतो. रुग्णांचे समुपदेशन करून आम्ही त्यांना आजाराची माहिती देतो. यासाठी मला आवश्यक असलेले सर्व सहकार्य प्रशासनाकडून मिळते. आम्ही बऱ्याचदा समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाते. हॉस्पिटलच्या अधिष्ठातांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतो, असे नायरमधील डॉक्टरने सांगितले.