नायगाव प्रसूतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ, क्वारंटाईन कालावधी संपण्याआधीच कामावर हजर होण्याचे फर्मान

नीता परब, मुंबई: पालिकेच्या नायगाव प्रसूतीगृहातील क्वारंटाईन कर्मचाऱ्यांना २४ तास उलटत नाही तोच ड्यूटीवर हजर राहण्याचे फर्मान दस्तुरखुद्द प्रसुतीगृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. या प्रसूतीगृहात

नीता परब, मुंबई: पालिकेच्या नायगाव प्रसूतीगृहातील क्वारंटाईन कर्मचाऱ्यांना २४ तास उलटत नाही तोच ड्यूटीवर हजर राहण्याचे फर्मान दस्तुरखुद्द प्रसुतीगृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. या प्रसूतीगृहात ९ कोरोनाबाधित महिलांना दाखल केल्याने हे फर्मान दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रशासनाच्या या आदेशानंतर कर्मचारी हजर तर झाले आहेत, पण कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्ट न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वॅब कधी करणार असा सवाल केल्यानंतर आता गरज नाही ? असे उलट उत्तर कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. त्यात नवीन कोरोनाबाधित गर्भवती महिलांना दाखल केल्याने हा धोका वाढण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या नायगाव प्रसूतीगृहात ३० एप्रिलला एका महिलेची सुखरूप प्रसूती केली. यादरम्यान या महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्याचा अहवाल ३ मेला दुपारी आला, या  दरम्यानच्या दिवसात या महिलेच्या संपर्कात प्रसूतीगृहाचे २१ कर्मचारी आले होते. यापैकी ४ कर्मचारी यात १ वरिष्ठ डॉक्टर, १ नर्स, १आया, १ सफाई कामगार या कर्मचाऱ्यांनी सदर कोरोनाबाधित महिलेची प्रसूती केली.  इतर १८ कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले होते.  ज्यामुळे प्रत्यक्षात संपर्कात आलेल्या चार कर्मचाऱ्यांना ७ दिवस क्वारंटाईन केले होते तर इतर कर्मचाऱ्यांना ५ दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश ३ मे ला देण्यात आले होते.  मात्र या आदेशाला २४ तास उलटत नाहीत तोच  कर्मचाऱ्यांना पुन्हा तातडीने ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, ४ मे ला पालिकेच्या नायर रुग्णालयातून ९ कोरोनाबाधित गर्भवती महिलांना नायगाव प्रसूतीगृहात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या सेवेसाठी तातडीने  हजर राहण्याचे फर्मान दिले असल्याचे समजते.  प्रशासनाच्या आदेशानंतर कर्मचारी ड्यूटीवर हजर झाले आहेत. पण आमची स्वॅब टेस्ट कधी करणार? असा सवाल कर्मचारी करत आहेत. आरोग्य विभाग आमच्या जीवाशी खेळत असल्याची भीती कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.