एनसीबीने चौकशीसाठी पाठवले ८५ गॅझेट्स; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढणार?

एनसीबीने गेल्या ४५ दिवसांत बॉलिवूडशी निगडीत लोकांचे ८५ गॅझेट्स गांधीनगरचे फॉरेन्सिक सायन्सेस डायरेक्टरेट (डीएफएस) मध्ये पाठवले आहेत. या गॅझेट्सवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच एनसीबीने मुंबईतील ड्रग्स आणि ड्रग्जशी निगडीच धंद्याशी संबंधित लोकांना ताब्यात घेतले आहे

मुंबई:सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) केलेल्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सची नावे समोर आली. एनसीबीने त्या सर्वांची चौकशी केलीच, याशिवाय अनेकांना अटकही केली होती. आता एनसीबीने या सर्व सेलिब्रिटींचे मिळून एकूण ८५ गॅझेट फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एनसीबीने गेल्या ४५ दिवसांत बॉलिवूडशी निगडीत लोकांचे ८५ गॅझेट्स गांधीनगरचे फॉरेन्सिक सायन्सेस डायरेक्टरेट (डीएफएस) मध्ये पाठवले आहेत. या गॅझेट्सवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच एनसीबीने मुंबईतील ड्रग्स आणि ड्रग्जशी निगडीच धंद्याशी संबंधित लोकांना ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत एनसीबीने ३० मोबाईल फोनमधून बराच डेटा हस्तगत केला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती, शौविक, सारा अली खान, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांचे मोबाइल फोनचा वापर ड्रग्जच्या अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांना शोधण्यासाठी करण्यात आला. त्यानंतरच्या छाप्यात जप्त केलेले अमली पदार्थही एनसीबीने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. यातून एनसीबीला ड्रग्जची गुणवत्ता निश्चित करता येणार आहे.