नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीने बजावलं समन्स; मुच्छड पानवाल्यामुळे आले अडचणीत

मुंबई : अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स बजावले आहे. ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई झाल्यानंतर समीर खान अडचणीत आले आहेत. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.

एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
मुच्छड पानवाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता.

मुच्छड पानवालाच्या चौकशीनंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स बजावलाय. तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे. समीर खान यांना यासाठीच समन्स बजावण्यात आलं असून चौकशी केली जाणार आहे.