राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन, कोरोनामुळे साधेपणाने होणार साजरा, जिल्हा परिषदा आणि पालिकांमध्ये घवघवीत यश मिळवण्याचे लक्ष्य

राष्ट्रवादी काँग्रेसनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानं वर्धापनदिन साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी कोरोनाच्या प्रभावातून ओसरल्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी तयारी सुरू केलीय. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. 

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला आज (१० जून) २२ वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजचा वर्धापनदिन साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय पक्षानं केला असून आगामी निवडणुकांसाठी कंबर कसण्याचा सल्ला नेतृत्वानं कार्यकर्त्यांना दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या पक्षाची स्थापना २२ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी केली होती.

    राष्ट्रवादी काँग्रेसनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानं वर्धापनदिन साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी कोरोनाच्या प्रभावातून ओसरल्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी तयारी सुरू केलीय. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.

    कोरोनाचं संकट निवळल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकांची रणनिती आखायला राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासूनच सुरुवात केलीय. दीड वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला होता. त्यानंतर पक्षाने आपली पाळंमुळं घट्ट रोवायला सुरुवात केली असून सध्या हा पक्ष राज्यात सत्तेतही आहे.

    सत्ता मिळाल्यानंतर राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिल्याचं चित्र असून पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. त्याचप्रमाणं सांगलीचं महापौरपद मिळवण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलंय. त्यामुळे पक्षाच्या अपेक्षा वाढल्या असून कोरोनाच्या काळातील वेळ आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी खर्च करण्याचं पक्षाचं धोरण असल्याचं समजतंय.

    या वर्षाच्या शेवटी आणि २०२२ च्या सुरुवातीला एकूण १५ महानगरपालिका, २०० पेक्षा अधिक नगरपालिका, नगर पंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. २०१२ प्रमाणे यंदादेखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष अव्वल कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.