‘भाजप सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय’ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला लखीमपुर हत्याकांडाचा निषेध

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज 'महाराष्ट्र बंद' ची हाक दिली होती.

    मुंबई – मोदी सरकार हाय हाय… योगी सरकारचा धिक्कार असो… भाजप सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… लखीमपूर के दरिंदो को फाशी दो… फाशी दो… किसानो के सम्मान मे राष्ट्रवादी मैदानमे… अशा जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादीने हुतात्मा चौक दणाणून सोडला.

    उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती.

    आज हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मोदी आणि योगी सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.

    सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यावर मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधत केंद्र व योगी सरकारचा जोरदार निषेध केला.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.