चंद्रकांतदादांचे २००+चे स्वप्न भंगलेले पाहून खूप वेदना, राष्ट्रवादीचे भाजप प्रदेशाध्यक्षांवर ट्विटरबाण

चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील २००+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प. बंगालमध्ये आले, मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. ४ वरुन ८४ वर जागा आल्या, हे बोलायला राज्यातील भाजप नेत्यांना जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.

    मुंबई : “चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या” असं म्हणत राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना डिवचले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Election Results 2021) भाजप १०० च्या आसपास जागा मिळवण्याची शक्यता आहे, तर तृणमूल काँग्रेसने १८५ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

    अमोल मिटकरींचे ट्विट काय?

    “चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील २००+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प. बंगालमध्ये आले, मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. ४ वरुन ८४ वर जागा आल्या, हे बोलायला राज्यातील भाजप नेत्यांना जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.” असे तिरकस विचार मिटकरींनी ट्विटरवर मांडले आहेत.

    पश्चिम बंगालची स्थिती काय

    आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार २०० पार’च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

    शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन

    “या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवूयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात” असे ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणाऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    रोहित पवारांनी साधला इंधनदरावरुन निशाणा

    दरम्यान, चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.