मुबंईत पावसाचा कहर : रेल्वे रुळावर अडकलेल्या  प्रवाशांच्या मदतीला सरसावल्या एनडीआरएफच्या बोटी

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज  वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली.पावसामुळे सखल भागात पाणी झाल्याने वाहतूककोंडी झाली तर  रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेसेवेवर परिणाम झाला.पावसाचा फटका मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेला बसला असून येथील वाहतूक ठप्प झाली.रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकून पडले होते या प्रवाशांच्या मदतीला एनडीआरएफचे जवान धावून आले. प्रवाशांना  एनडीआरएफच्या बोटीतून रेस्क्यू करण्यात आलं. 

मस्जिद बंदर ते भायखळा दरम्यान २ लोकल ट्रेन्स अडकल्या होत्या. कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेन्समध्ये १५० प्रवाशी होते त्यांना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी, पोलिसांनी रेस्क्यू केले. तर दुसऱ्या ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांचीही सुटका एनडीआरएफच्या माध्यमातून करण्यात आली.पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांची मुंबई महापालिकेकडून जवळच्या महापालिका शाळांमध्ये तात्पुरती निवासस्थानाची सोय करण्यात आली.