ईव्हीएमकरिता गोडाउन आणि महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार
ईव्हीएमकरिता गोडाउन आणि महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सध्या निवडणुकीबाबत इव्हीएम मशिन्सच्या घोटाळ्याकडे अनेक पक्षांकडून सतत बोट दाखवले जात आहे. निवडणुकीनंतर या ईव्हीएम मशिन्स सुरक्षित कशा ठेवायच्या हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या सुरक्षीत ठेवण्यासाठी मुंबई शहरात लवकरच गोडाऊन्स उभारले जावेत आणि त्याच्या निर्मितीसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाकडे निधीची मागणी करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनिक आढावा बैठक घेण्यात आली.

  • केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज्यमंत्री सत्तार करणार निधीची मागणी

मुंबई (Mumbai). सध्या निवडणुकीबाबत इव्हीएम मशिन्सच्या घोटाळ्याकडे अनेक पक्षांकडून सतत बोट दाखवले जात आहे. निवडणुकीनंतर या ईव्हीएम मशिन्स सुरक्षित कशा ठेवायच्या हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या सुरक्षीत ठेवण्यासाठी मुंबई शहरात लवकरच गोडाऊन्स उभारले जावेत आणि त्याच्या निर्मितीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निधीची मागणी करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनिक आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबतही चर्चा झाली. या गोडाऊनसाठी मुंबई शहरात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. दुसरीकडे, महसूल वसुलीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिले.

मुंबई शहरातील वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1मध्ये करण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या या धोरणामुळे महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या कामासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

तलाठी भरती करणार
मुंबई जिल्ह्यात एक उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि दोन तहसील कार्यालयाची लवकरच स्थापना करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे मुंबई जिल्ह्यातील नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले. तसेच मुंबई शहरात प्रभाग आणि वॉर्ड पातळीवर तलाठ्यांची गरज आहे. त्यामुळे लवकरच तलाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनस्तरावर गती देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

हाजीअली दर्ग्याच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर

मुंबईतील श्रद्द्धास्थान असलेल्या बाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सर्वधर्माच्या भाविकांना सोयी, सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या विशेष निधी देण्यात आला आहे. त्यामुळे बाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट केली जाईल.
— अब्दुल सत्तार, महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री