हित साधण्याचा नवा फंडा : नवीन केंद्रीय सहकार खात्याचा निश्चितच महाराष्ट्राला लाभ होईल : प्रविण दरेकर

गावातील विविध कार्यकारणी सोसायटीपासून ते राष्ट्रीय स्तरावरच्या सहकार सेक्टरचं त्यांना खूप ज्ञान असून सहकार विषयात ते अनुभवी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

    मुंबई : महाराष्ट्राला सहकाराची पंरपरा लाभली आहे. राज्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सहकार आता केंद्रीय पातळीवर पोहचला असून याचा लाभ नक्कीच महाराष्ट्राला व अन्य राज्यांना होईल व महाराष्ट्राचे सहकार अधिर बळकट होईल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. प्रविण दरेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्यावतीने मनःपूर्वक आभार मानले.

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आणखी एक नवी आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, सहकाराचा अनुभव असलेले धाडसी नेतृत्व सहकार खाते सांभाळणार आहे. गृहमंत्री अमित शहा अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्यांची कार्यपद्धती उत्तम असून त्यांचा या विषयात अभ्यास चांगला आहे. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळेस माझ्यासोबत त्यांनी सुमारे दोन तास सहकार चळवळीवर चर्चा केली. गावातील विविध कार्यकारणी सोसायटीपासून ते राष्ट्रीय स्तरावरच्या सहकार सेक्टरचं त्यांना खूप ज्ञान असून सहकार विषयात ते अनुभवी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

    सहकार हे केंद्राच्या कृषी कायद्यांतर्गत एक छोटासा भाग आहे. देशभर वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय सहकारी फेडरेशन महामंडळ आस्थापना आहेत, परंतु त्यांना स्वतंत्र असं खात नव्हतं. पण आता निश्चितपणे सहकार खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या व विविध राज्यांमधील सहकाराला बळकटी मिळेल. महाराष्ट्रातील साखर कारखाने केवळ सहकराच्या जीवावर स्थिरावले असून सहकारी साखर कारखान्यांना केंद्राच्या माध्यमातून जी बळकटी आवश्यक आहे, ती बळकटी निश्चितपणे केंद्रीय सहकार खात्यांच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

    सहकार खात्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपविणे म्हणजे निश्चितच सहकार चळवळ सशक्त करणे आणि सहकाराच्या माध्यमातून राज्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देणं हाच खरा उद्देश आहे. त्यामुळे कोणावर अंकुश आणण्यासाठी या नवीन खात्यांची निर्मिती झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

    New funda to benefit Maharashtra will definitely benefit from the new Central Co operation Department Pravin Darekar