परप्रांतियांची नोंद ठेवण्याच्या मुख्यमंत्र्याच्या सूचनेवरून नवा राजकीय वादंग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा केवळ परप्रांतिय समाजाला लक्ष्य करण्यास आक्षेप

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी केवळ परप्रांतिय समाजाला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत सरकारने कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करण्या ऐवजी एखाद्या समाजाला दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. ते माध्यमांशी पुण्यात बोलत होते.

    मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साकीनाका निर्भया प्रकरणानंतर गंभीर दखल घेत काल राज्यातील पोलीस अधिका-यांची महत्वाची बैठक घेतली. महिलांवरील अत्याचारांबाबत पोलीसांना कठोर कायद्याची अंमलबजावणीचे आदेश देताना मुख्यमंत्र्यानी राज्यात येणा-या परप्रांतियांवर, त्यांच्या कारवायांची नोंद ठेवण्याची सूचना पोलीस विभागाला केली आहे. त्यावरून आता नवा राजकीय वादंग सुरू होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी केवळ परप्रांतिय समाजाला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत सरकारने कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करण्या ऐवजी एखाद्या समाजाला दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. ते माध्यमांशी पुण्यात बोलत होते.

    सेना आणि मनसेसाठी स्थानिक विरुध्द परप्रांतियांचा मुद्दा

    दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात महिला अधिका-यांवर हल्ला झाल्यानंतर परप्रांतियांवर सरकारचा अंकुश नसल्याची टिका केली होती आणि परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची नोंद ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. मुख्यमंत्री ठाकरे यानीही नेमके हेच मत व्यक्त केल्याने मनसेमध्ये राजसाहेबांची भुमिका कशी योग्य होती याची चर्चा होत असून समाधान व्यक्त केले जात आहे. तर महापालिका निवडणुकीत सेना आणि मनसे साठी स्थानिक विरुध्द परप्रांतिय हा मुद्दा राहणार असल्याचे संकेत त्यामुळे मिळाले आहेत.

    गुन्हेगारीला परप्रांतिय – स्थानिक रंग देणे योग्य नाही

    मात्र नेमके या भुमिके विरोधात भाजपची भुमिका असून परप्रांतियांवर सरसकट गुन्हेगारींचा शिक्का लावणे योग्य नाही, आतापर्यंत ज्या महिला अत्याचाराच्या घटना झाल्या आहेत त्यात केवळ परप्रांतिय होते का?असा सवाल कर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी मुख्यमंत्र्याच्या भुमिकेला हरकत घेतली आहे. ते म्हणाले की, याचा आर्थ स्थानिक लोकांकडून अश्या काही घटनाच घडत नाहीत का? असा सवाल त्यानी केला. ते म्हणाले की गुन्हेगारीला भाषा जात प्रांत नसतो त्यामुळे कायद्यासमोर गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यामुळे त्याला हा परप्रांतिय किंवा स्थानिक असा रंग देणे योग्य होणार नाही.