भुर्दंड टाळण्यासाठी लक्षात ठेवा बँकिंगचे हे नवे नियम

पुढच्या महिन्यापासून बँकिंगच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळं तुम्ही जर नियमित बँकेचे व्यवहार करत असाल, तर काही सवयी तुम्हाला बदलाव्या लागू शकतात. जाणून घेऊया, नेमके काय बदल होणार आहेत.

बँकेकडून साधारणपणे मिनिमम बॅलन्स, एसएमएस, एटीएम आणि चेकबुक या चार सुविधा ग्राहकांना दिल्या जातात. त्याबद्दल ठराविक शुल्कदेखील आकारलं जातं. मात्र यापुढं आणखी एका गोष्टीवर शुल्क आकारायला सुरुवात होणार आहे. एका महिन्यात तुम्ही किती वेळा बँकेतून पैसे काढू शकता हे निश्चित केलं जाईल आणि त्यापेक्षा अधिक व्यवहार तुम्ही केलेत, तर त्याबदल्यात तुम्हाला शुल्क भरावं लागू शकतं.

सध्या बँक ऑफ बडोदानं हे शुल्क आकारण्याचं निश्चित केलंय. १ नोव्हेंबर २०२० पासून हा नियम बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी लागू होईल. यामध्ये चालू खाते, कॅश क्रेडीट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैशांचे व्यवहार करण्यासाठी वेगवेगळं शुल्क निर्धारित करण्यात आलंय. बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ऍक्सिस बँक आणि सेंट्रल बँक याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत.

नेमके काय बदल होणार?

  • दरमहा केवळ तीन वेळा बँकेत पैसे भरणे निशुःल्क असेल. त्यानंतर प्रत्येक वेळी ४० रुपये मोजावे लागतील.
  • ज्येष्ठ नागरिकांनाही कुठल्याही सवलतीविना हाच नियम लागू असेल.
  • जनधन खातेधारकांना हा नियम असणार नाही. मात्र चौथ्यांदा पैसे काढताना मात्र १०० रुपये मोजावे लागतील
  • सीसी, करंट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यांमध्ये प्रतिदिन १ लाख रुपये जमा करता येतील.
  • एक लाखाहून अधिक रकमेच्या व्यवहारासाठी शुल्क आकारण्यात येईल
  • अशा ग्राहकांना एक लाखाच्या वरील प्रत्येक हजार रुपयांसाठी १ रुपया आकारला जाईल.
  • यासाठी कमीत कमी ५० रुपये आणि जास्तीत जास्त २० हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.