राज्यात ६,२१८ नवीन रुग्णांची नोंद; ५१ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातही रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. राज्यात ६,२१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ५१ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.

    मुंबई : मंगळवारी राज्यात ६,२१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याचे समाेर आले आहे.  ही चिंतेची बाब असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. ही रुग्णसंख्या आटाेक्यात आणण्यासाठी राज्य आराेग्य विभाग विविध प्रयत्न करत आहे. आता राज्यातील कराेना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,१२,३१२ झाली आहे.

    मंगळवारी ५,८६९ रुग्ण बरे हाेऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ काेराेना बाधित रुग्ण बरे हाेऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५३,४०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील अाठवड्यातील आहते. उर्वरित ७ मृत्यू हे एक अाठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७ मृत्यू नागपूर-२, रत्नागिरी-२, पुणे-१, ठाणे-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत.

    सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,१२,३१२ (१३.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७९,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत मंगळवारी ८ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत ६४३ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत काेराेनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार दिसुन येत आहे, ज्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आराेग्य विभागाकडून करण्यात आले आहे.