कोरोना रोखण्यासाठी `निकोटिन’ एक महत्त्वाचा घटक; सिगारेट, बिडी विक्रेता संघटनांचा न्यायालयात दावा

निश्चितच धुम्रपान हे शरीरासाठी घातक आहे, त्यात काहीच वाद नाही, मात्र, धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा अधिकचा धोका संभवत नाही. उलट त्यातील निकोटिन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, असा दावा व्यापाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने अँड. रवी कदम यांनी केला.

    मुंबई : धुम्रपानाने कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. उलट त्यातील `निकोटीन’ हा कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज मंगळवारी पान-बिडी-तंबाखू विक्रेता संघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. त्याची दखल घेत या दाव्यात तथ्य आढळल्यास केंद्र सरकारला सिगरेट अन्य तंबाखूच्या पाकिटांवरून वैधानित इशारा काढावा लागेल, असा खोटक टोला खंडपीठाने लगावला आणि हस्तक्षेप अर्ज दाखल करून घेत त्यांना युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील विविध समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांनी अ‍ॅड. अर्शिल शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्य सरकारला मागील सुनावमीदरम्यान खंडपीठाने काही मुद्दांवर बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मंगळवारी त्या मुद्दांवर भूमिका स्पष्ट केली.

    त्यातील धुम्रपानामुळे कोरोना रुग्णांवर होणाऱ्या परिणामांबाबत माहिती देताना कुंभकोणी यांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या डॉक्टरांनी केलेला रिसर्चचा अहवाल खंडपीठासमोर सादर केला. त्यानुसार धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याचा दावा टाटा सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून केला असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसे असले तरीही काही उत्पादकांनी आमच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. मात्र, सरकारचा बिडी, सिगरेट उत्पादकांना कोणताही विरोध नाही. तसेच आम्ही सिगारेट अथवा बिडी उत्पादनावर, विक्रीवर अद्याप कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    त्यावर फेडरल रिटेलर असोसिएशन आणि पान-बिडी-तंबाखु विक्रेता संघाने त्याविरोधात मंगळवारी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. निश्चितच धुम्रपान हे शरीरासाठी घातक आहे, त्यात काहीच वाद नाही, मात्र, धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा अधिकचा धोका संभवत नाही. उलट त्यातील निकोटिन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, असा दावा व्यापाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने अँड. रवी कदम यांनी केला.

    तसेच अमेरिका, फ्रांन्स, इटली, चीन या देशातही यावर अभ्यास करण्यात आला असून त्यासंदर्भात आपल्याला बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. त्याची दखल घेत जर विक्रेत्यांच्या संघटनांचा दावा स्वीकारला तर धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे, हा केंद्र सरकारने अशा उत्पादनांवर केलेला वैधानिक इशारा काढून टाकावा लागेल असा टोला लगावत खंडपीठाने त्यांचा हस्तक्षेप अर्ज स्विकारत सुनावणी 1 जुलैपर्यंत तहकूब केली.