मुंबईत आजपासून रात्रीची जमावबंदी होणार सुरू ; मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

आम्ही पाहत आहोत, ज्या सोसायटींमध्ये पाच पेक्षा अधिक करोनाबाधित आढळतील, त्या सोसायट्या सील करण्यात येणार आहेत. झोपडपट्टी व चाळींमध्ये मोठ्यासंख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर, रात्रीच्या जमावबंदीमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील." अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर नाशिक, औरंगाबाद सारख्या शहारांमध्ये मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक करण्यात येणार आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, आता मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून मुंबईत रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर, राज्यात कोरोनाशी संबिधत घालण्यात आलेले निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत.

    “आम्ही पाहत आहोत, ज्या सोसायटींमध्ये पाच पेक्षा अधिक करोनाबाधित आढळतील, त्या सोसायट्या सील करण्यात येणार आहेत. झोपडपट्टी व चाळींमध्ये मोठ्यासंख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर, रात्रीच्या जमावबंदीमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

    दरम्यान, आजपासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय शुक्रवारीच घेतला आहे.

    राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.