राज्यात गर्दीला आवर घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सूचनांची दखल घेत राज्यात रात्रीची संचारबंदी

केंद्र सरकारने नुकतेच केरळचा अनुभव पाहता राज्य सरकाराना सतर्क राहण्याच्या तसेच सणाच्या निमित्ताने राज्यात निर्बंध शिथील केल्यानंतर काही भागांत राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याबाबत सूचना दिल्या आहेत. तर, राज्यात येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्र असे अनेक सण आहेत. त्या सण समारंभात गर्दीमुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

  मुंबई : उच्च न्यायालयाने सार्वजनिक जागा, समुद्र किनारे तसेच हॉटेल इत्यादी ठिकाणी  करोना रुग्णांची वाढती संख्या, राजकीय कार्यक्रमातील वाढती गर्दी, सणांबाबत नियमावली यासारख्या अनेक प्रश्नांबाबत नुकतीच चिंता व्यक्त केल्याचे पडसाद आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले आहेत. राज्यात गर्दीला आवर घालण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यासोबतच रात्रीची संचार बंदी अथवा जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत टास्क फोर्स सोबत चर्चा करून निर्णय घेण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  गर्दीमुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता

  केंद्र सरकारने नुकतेच केरळचा अनुभव पाहता राज्य सरकाराना सतर्क राहण्याच्या तसेच सणाच्या निमित्ताने राज्यात निर्बंध शिथील केल्यानंतर काही भागांत राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याबाबत सूचना दिल्या आहेत. तर, राज्यात येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्र असे अनेक सण आहेत. त्या सण समारंभात गर्दीमुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सणांबाबत नियमावली तयार करण्याच्या सूचना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

  रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना

  रुग्णवाढीत महाराष्ट्र गेल्या दोन्ही लाटांमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला करोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना तीनच दिवसांपूर्वी केली होती. याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नाइट कर्फ्यू लागणार की जमावबंदी लागू होणार याचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी बोलून घेणार आहेत त्यानुसार मुख्य सचिवांकडून आदेश निर्गमीत होण्याची शक्यता आहे.

  राजकीय कार्यक्रमांबाबत ठोस निर्णय

  यामध्ये राजकीय कार्यक्रमात होणारी गर्दी करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय कार्यक्रमांबाबत काहीतरी ठोस निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती या सूत्रांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन येत्या रविवारी होणा-या डॉक्टर परिषदेतूनही केले जाणार असून वारंवार प्रशासनाकडूनही हेच सांगण्यात येत आहे.