राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नको; भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने उद्या राज्यभर आक्रोश आंदोलन

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे  राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी मागणी करत भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यभर आक्रोश आंदोलन केले जाणार आहे.

  मुंबई (Mumbai) : राज्य निवडणूक आयोगाने (the State Election Commission) पाच जिल्ह्यासह पालघरमधील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे  राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी मागणी करत भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यभर आक्रोश आंदोलन केले जाणार आहे.

  प्रदेश भाजप कार्यालयात ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी माजी ओबीसी कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे उपस्थित होते.

  आघाडी सरकारने वेळकाढूपणा केला
  यावेळी माहिती देताना टिळेकर म्हणाले की, सहा महिने महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा केला. त्यानंतर निवडणुका लागल्या आहेत, एक प्रकारे हा ओबीसी समाजासोबत विश्वासघात असून उद्या भाजपा करणार राज्यभर धरणे आंदोलन करून या निर्णयाचा निषेध करणार आहे. ते म्हणाले की, राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यानी गेल्या सहा महिन्यात आरक्षणासाठी काहीच केले नाही त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहीजे.

  आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत
  डॉ कुटे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यात भाजप नेते आमदार पदाधिकारी उद्या निदर्शने करतील आणि विश्वासघातकी आघाडी सरकारने आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेवू नयेत अशी मागणी करतील. दरम्यान नागपूरमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्र शेखर बावनकुळे यानी देखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले नसून राज्य सरकारच्या विरोधात उद्या भाजप धरणे आंदोलन करण्यात करणार असल्याची माहिती दिली.

  पैसेवाल्यांना उमेदवा-या देण्यासाठी राज्य सरकारचे षडयंत्र
  ते म्हणाले की, ओबीसी च्या जागेवर जाणीवपूर्वक सुभेदार आणि पैसेवाले लोकांना लढविण्यासाठी राज्य सरकारने केलेले हे षडयंत्र असल्याचा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला आहे. राज्य सरकारन ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी काहीच केले नसून सरकारचा बुरखा जनतेसमोर फाडण्यासाठी उद्या भाजपचे सर्व नेते रस्त्यावर येणार आहेत, प्रत्येक तालुका, शहरात, मंडळात भाजप तर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.