एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये; छगन भुजबळांचे प्रशासनाला आदेश

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यभरात चांगला नावलौकिक असलेली बँक होती. बँकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

    मुंबई : नाशिक जिल्हातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज दिले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटप आणि इतर मुद्द्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

    नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यभरात चांगला नावलौकिक असलेली बँक होती. बँकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

    महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेपोटी जिल्हा बँकेला 920 कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त 231.51 कोटी पिक कर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे शेतऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.