मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, नाना पटोलेंचं रोखठोक मत, म्हणाले की…

नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

  मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी, येत्या काळातील निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाबाबत रोखठोक भाष्य केलं. नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. तसंच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं म्हणाले होते. इतकंच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं.

  आता यासर्वांवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं. नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील एक ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहेत. त्याला उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री”

  पाच वर्ष मुख्यमंत्री कोण ?

  दरम्यान, यावेळी नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

  काँग्रेस स्वबळावर ही जनभावना

  शरद पवार यांनी आपले मत सांगितले, तसं मी माझ्या पक्षाचे मत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढावे, ही जनभावना आहे. मी मन की बात सांगत नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

  तसेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं,अशी इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर केली. नाना पटोले चांगला व्यक्ती असल्याचं त्यांनी स्वत:च सांगितलंय. गुरूवारी रात्री पारस फाट्यावरील ‘हॉटेल मराठा’ येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नाना पटोले यांनी त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम निष्ठेने करण्याचा सल्ला दिला आहे.

  शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद

  राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि तसं ठरल्याची राज्यात जोरदार चर्चा आहे. पण ,असं काहीच ठरलेलं नसून आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार असं रोखठोकपणे संजय राऊत सांगत आहेत. नाशिक दौऱ्यात संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आलाआघाडीत सत्तेचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलेला आहे का? त्यावेळेस संबंधित पत्रकाराला करेक्ट करत राऊत म्हणाले की, ‘मी रोखठोकमध्ये सत्तेच्या फॉर्म्युल्याबद्दल लिहीलेलं नाही. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसा इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्णकाळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशा प्रकारची कमिटमेंट सुरुवातीपासून झालेली आहे. आणि मला असं वाटतं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा जाहिरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे’.