मोनो केवळ धावतेय, जाचक नियमांमुळे प्रवाशांची पाठ

चेंबूर-वडाळा-जैकब सर्कल या मार्गावरील मोनोकडे प्रवासी सध्या पाठ फिरवताना दिसतायत. मोनो रेल्वेच्या दररोज ६८ फेऱ्या चालवल्या जातात. प्रत्येक फेरीत १२४ प्रवाशांची वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात याच्या पावपट प्रवासीच मोनो रेल्वेनं जाणं पसंत करतायत. लॉकडाऊनपूर्वी सुमारे ५०० प्रवासी मोनोच्या प्रत्येक फेरीतून प्रवास करू शकत होते.

मुंबई : लॉकडाऊनमुळे ७ महिने बंद असणारी मोनो रेल्वे पुन्हा सुरू झालीय. मात्र मोनोमध्ये प्रवासीसंख्या अगदीच तुरळक असल्याचं चित्र दिसतंय. २२ मार्चपासून बंद असणारी मोनो १८ ऑक्टोबरपासून सुरू झालीय. मात्र प्रवासीच नसल्यामुळे मोनोच्या रिकाम्या डब्यांच्या फेऱ्या सुरू असल्याचं चित्र आहे.

चेंबूर-वडाळा-जैकब सर्कल या मार्गावरील मोनोकडे प्रवासी सध्या पाठ फिरवताना दिसतायत. मोनो रेल्वेच्या दररोज ६८ फेऱ्या चालवल्या जातात. प्रत्येक फेरीत १२४ प्रवाशांची वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात याच्या पावपट प्रवासीच मोनो रेल्वेनं जाणं पसंत करतायत. लॉकडाऊनपूर्वी सुमारे ५०० प्रवासी मोनोच्या प्रत्येक फेरीतून प्रवास करू शकत होते.

दिवसभरात केवळ २१०० प्रवासी

मोनो रेल्वेतून प्रत्येक दिवशी केवळ २१०० प्रवासीच प्रवास करत असल्याची माहिती आहे. मुंबईतील बहुतांश कार्यालयं आता सुरू झालीयत. सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसतानादेखील लोकल रेल्वे आणि मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी होतेय. बेस्ट बसलादेखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र मोनोकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत.

हळूहळू प्रतिसाद वाढतोय

मोनो जेव्हा सुरू झाली तेव्हा दिवसाला केवळ ३०० प्रवासी प्रवास करत होते. आज दोन हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतातयत, असं एमएमआरडीएचे सहआयुक्त बी. जी. पवार यांनी म्हटलंय. कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे मोनो रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची सर्व काळजी आम्ही घेत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.