No salary was paid once in four years; Time of starvation on the workers of solid waste department of Mumbai Municipal Corporation

गेल्या चार वर्षांपासून पालिकेच्या एच पश्चिम विभागातील घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या दिलीप सोलंकी यांना पालिका प्रशासनाने चार वर्षांत एकही पगार दिलेला नाही. मात्र नियमित काम करून घेतले जात आहे. पगार मागितल्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे घरखर्च चालवणे सोलंकी यांना डोहीजड झाले असून उपासमारीत दिवसेंदिवस भर पडत चालली असल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

  मुंबई : गेल्या चार वर्षांपासून पालिकेच्या एच पश्चिम विभागातील घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या दिलीप सोलंकी यांना पालिका प्रशासनाने चार वर्षांत एकही पगार दिलेला नाही. मात्र नियमित काम करून घेतले जात आहे. पगार मागितल्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे घरखर्च चालवणे सोलंकी यांना डोहीजड झाले असून उपासमारीत दिवसेंदिवस भर पडत चालली असल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

  १२ जानेवारी २०१७ साली दिलीप सोलंकी आपल्या आजीच्या जागेवर अनुकंपातत्त्वावर महानगरपालिकेत कामगार म्हणून रुजू झाले. त्यांना एच पश्चिम विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्यात काम देण्यात आले. तत्पूर्वी त्यांना नियुक्ती पत्र, बायोमेट्रिक तसेच कामगार ओळखपत्र, कामगार संकेतांक क्रमांक या कामावर रुजू राहण्यासाठीचे सर्व अधिकृत कागदपत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार सोलंकी यांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी ते रोज महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील घनकचरा येथे कामावर जातात त्यांची हजेरीही लावली जाते.

  कोरोना काळात देखील ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र गेल्या चार वर्षांत सोलंकी यांच्या पदरात एकही रुपयांचे धन पालिकेने दिलेले नाही. याबाबत एच पश्चिम सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सदरील प्रकारणाबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाही, असे सांगण्यात आले.

  गेल्या चार वर्षांपासून अनुकंपा तत्वावर मी पालिकेच्या घनकचरा विभागात नोकरी करत आहे. मात्र मला गेल्या चार वर्षांत एकही रुपया पगार पालिकेने दिलेला नाही. याबाबत दर महिन्याला वरिष्ठांकडे तक्रार करतो, परंतु ते टाळाटाळ करतात व पगाराबाबत खोटी आश्वासने देतात असे दिलीप सोलंकी म्हणाले.

  एखाद्या कामगाराला गेल्या चार वर्षांत पगार न मिळणे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्या कामगाराला त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला मिळालाच पाहिजे.

  - मिलिंद रानडे, कामगार नेते