लस नाही, तर मृत्यूनंतर वारसांना भरपाई नाही; गृह खात्याची मुंबई पोलिसांना तंबी 

राज्यात सध्या जवळ्पास २ लाख ३० हजार तर मुंबईत त्यातील सुमारे ५० हजार पोलीस जवानांची संख्या आहे. त्यापैकी मुंबईतील तब्बल १५ टक्के पोलिसांनी अद्याप कोरोना लस घेण्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पोलिसांनी तातडीने आपले लसीकरण करून घ्यावे अन्यथा भविष्यात त्यांचे बरेवाईट झाले तर त्यांच्या वारसांना ५० लाखांची नुकसान भरपाई अथवा सानुग्रह अनुदान नाकारण्यात येईल अशी तंबी राज्याच्या गृह खात्याने पोलिसांना आज एका पोलीस परिपत्रकाद्वारे दिली आहे.

    मुंबई : राज्यात सध्या जवळ्पास २ लाख ३० हजार तर मुंबईत त्यातील सुमारे ५० हजार पोलीस जवानांची संख्या आहे. त्यापैकी मुंबईतील तब्बल १५ टक्के पोलिसांनी अद्याप कोरोना लस घेण्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पोलिसांनी तातडीने आपले लसीकरण करून घ्यावे अन्यथा भविष्यात त्यांचे बरेवाईट झाले तर त्यांच्या वारसांना ५० लाखांची नुकसान भरपाई अथवा सानुग्रह अनुदान नाकारण्यात येईल अशी तंबी राज्याच्या गृह खात्याने पोलिसांना आज एका पोलीस परिपत्रकाद्वारे दिली आहे.

    राज्यातील जवळ जवळ सर्व पोलिसांनी कोरोना लस घेतली असल्याचे सांगण्यात येत असले तरी मुंबईतील १५ टक्के पोलिसांनी अद्याप याकडे दुर्लक्ष करत लस घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजच गृह खात्याने एका परिपत्रकाद्वारे त्यांना लस घेण्याबाबत सावध केले आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून सरकारने सर्व कोविड योध्यासाठी मोफत लसीकरण सुरू केले आहे. त्यानंतर सर्व पोलिसांना वेळोवेळी लस घेण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर आज हे परिपत्रक काढून ही तंबी देण्यात आली आहे.

    या पत्रकात बहुतांश पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांनी लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला नसल्याकडे लक्ष वेधले आहे. लस ही कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी शस्त्र असून, त्यामुळे कोरोनाची लागण होत नाही. मात्र जर झालीच तर त्यात मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे सर्व पोलिसांनी लस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पोलीस अधिकारी आणि मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेण्यास बंधनकारक करावे. इतकेच नाहीतर एकही कर्मचारी यातून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

    दरम्यान, या परिपत्रकात गेल्या वर्षी २९ मे च्या दरम्यान कोरोनाची लागण होऊन त्यात बळी गेलेल्यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्या धर्तीवर भविष्यात जर लस न घेणाऱ्यांबाबत अशा घटना घडल्या तर याबाबतचा अहवाल मागवून त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही लस न घेणाऱ्या पोलिसांना सूचित करण्यात आले आहे.

    राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या जवानांची संख्या मुंबईच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे वरिष्ठांची त्यांच्यावर करडी नजर असते. मुंबईत मात्र स्थिती याउलट असल्याने सतत गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. काहीजण तर वर्ष वर्ष ड्युटीवर नसतात त्यामुळे लसीकरणाबाबत ते उदासीन असतात. त्याशिवाय संरक्षित ठिकाणी काम करणाऱ्यांचीही मानसिकता लसीकरणाबाबत उदासीन असते त्यामुळे लसीकरणापासून दूर असलेल्यांची संख्या मोठी आहे असे एका विद्यमान पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.