राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच, पण राणेंच्या पुर्ण पाठिशी – देवेंद्र फडणवीस

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” या वक्तव्यानंतर शिवसैनिकांकडून राज्यभर भाजप कार्यालयावर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. याच संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत “आम्ही नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, आम्ही राणेंच्या पुर्ण पाठिशी आहोत.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आठवत नाही, त्याचा निषेध करण्याचा दुसरा मार्ग असू शकतो. त्यामुळे, आम्ही राणेंच्या वक्तव्याला पाठिंबा देत नाही, पण शिवसेना ज्या प्रकारे प्रतिसाद देत आहे, त्याप्रमाणे आम्ही राणेंच्या सोबत पूर्ण ताकदीने आहोत.”

  पोलिस शिवसैनिकांचे हल्ले थांबवू शकत नाहीत ?

  “मला संबंधित सर्व पोलिस आयुक्तांना सांगायचे आहे की, जर भाजपच्या कार्यालयावर हल्ले झाले तर आम्हीही गप्प बसणार नाही. आमच्या ज्या भागातील कार्यालयांची तोडफोड होइल भाजप त्या भागातील पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आंदोलन करेल. आम्ही राडा करत नाही, आम्ही राडेबाज नाही.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

  पोलीस अधिकारी स्वतःला छत्रपती समजतात का?

  “पोलिसांनी नोंदवलेले आरोप पत्र वाचले, जे आदेश देण्यात आले आहेत. ते पाहिल्यानंतर असे वाटते की, वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतःला छत्रपती (शिवाजी महाराज) समजतात का? पोलिसांनी कलमे लावण्यापुर्वी ज्या कलमांवर गुन्हा दाखल केला जात आहे, त्यांचे जबाब घेणे देखील आवश्यक आहे. पोलिसांकडून होणारी कारवाई सरकारला खूश करण्यासाठी करण्यात आली आहे.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.