तारणहार नाहीच; सरकारचाही कानाडोळा, एसटी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट; स्वेच्छा निवृत्ती योजना गुंडाळली?

एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्ती याेजना काही महिन्यांपूर्वी लागू करण्यात आली हाेती. सदर याेजना ५० वर्ष पूर्ण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली हाेती. सध्या २७ हजार कमर्चाऱ्यांनी पन्नाशी पार केलेली आहे. या याेजनेमुळे महामंडळाची ११० काेटी रुपयांची पगाराची बचत हाेणार असली तरीही स्वेच्छा निवृत्तीसाठी महामंडळाला १४०० काेटी रुपये खर्च येणार हाेता.

  • २९०० अर्जांची लावली वासलात

नीता परब

मुंबई : एसटी महामंडळाला मागील काही वर्षांपासून प्रंचड आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. परिणामी, हा हाेणारा ताेटा भरुन काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून स्वेच्छा निवृत्ती याेजना लागू करण्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला हाेता. सदर याेजना ५० वर्ष पूर्ण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हाेती. परंतु, एसटी महामंडळाच्या तिजाेरीत खडखडाट असल्याने स्वेच्छा निवृत्ती याेजना गुंडाळण्यात आली असल्याचे खासगीत बाेलले जात आहे. या याेजनेसाठी मागील काही महिन्यांपासून २९०० कर्मचाऱ्यांचे अर्ज आले हाेते, पण हे अर्ज बासनात गुंडाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वेच्छा याेजना गुंडाळली ?

एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्ती याेजना काही महिन्यांपूर्वी लागू करण्यात आली हाेती. सदर याेजना ५० वर्ष पूर्ण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली हाेती. सध्या २७ हजार कमर्चाऱ्यांनी पन्नाशी पार केलेली आहे. या याेजनेमुळे महामंडळाची ११० काेटी रुपयांची पगाराची बचत हाेणार असली तरीही स्वेच्छा निवृत्तीसाठी महामंडळाला १४०० काेटी रुपये खर्च येणार हाेता.

एसटीचा पूर्वीचा ताेटा पाच हजार काेटी आहे. त्यात लाॅकडाउनमध्ये ३ हजार ८०० कोटींचा महसूल बुडाला परिणामी, आर्थिक चणचण अधिक भासू लागली आहे. ज्यामुळे महामंडळाने स्वेच्छा निवृत्ती याेजना लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तब्बल २८ हजार कर्मचाऱ्यांच्या नाेेकऱ्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत हाेती.

तब्बल २५ हजार कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीला तयार हाेतील असे महामंडळाकडून बाेलले जात हाेते. या याेजनेअंतर्गत महामंडळाकडे मागील काही महिन्यात केवळ २९०० कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल झाले, पण दाखल झालेल्या अर्जाबाबत काेणताही विचार न करता हे अर्ज गुंडाळून ठेवण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकारी खासगीत सांगतात.

स्वेच्छा निवृत्ती याेजनेचा घाट का घालायचा ?; कर्मचाऱ्यांचा सवाल

“महामंडळाकडे आर्थिक चणचण मागील काही वर्षांपासून आहे मग स्वेच्छा निवृत्ती याेजनेचा घाट का घालायचा? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराकरीता देखील महामंडळाला इतरत्र हात पसरावे लागत आहेत. अशात स्वेच्छा निवृत्ती याेजनेबाबत परिपत्रक काढण्यापूर्वी महामंडळाने याबाबत अभ्यास केला नव्हता का?” असा सवाल कर्मचारी संघटनेकडून केला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास झाला असल्याचाही आराेप कर्मचारी संघटनेकडून केला जात आहे.